प्रकाशा ते शहादा रस्त्यावरून ये-जा करताना समस्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे पाच-पाच फूट अंतराचे वाळूचे थर साचले आहेत. दोन वाहने आल्यावर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला गेल्यास वाहन घसरून अपघात होतो. शुक्रवारी सायंकाळीही प्रकाशाकडे येणारा मोटारसायकलस्वार या वाळूवरून घसरल्याने अपघात झाला. तसेच काही ठिकाणी एकेरी मार्गामुळे दररोज वाहतूक ठप्प होऊन प्रवासी व वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक ठप्प झाल्यावर काथर्दे, भादा, धुरखेडा किंवा नांदरखेडाकडून डामरखेडामार्गे शहादा येथे पोहोचावे लागते. वाहतूक ठप्प होत असल्याने नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी व विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही.
प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतकऱ्यांना रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पाईप टाकून रस्त्याची सोय करून देण्याबाबत संबंधित ठेकेदाराला अनेकवेळा सांगितले. मात्र, संबंधित ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.