नंदुरबार : चोरीसह इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपी शहादा न्यायालयाच्या आवारातून पसार झाला. विशेष म्हणजे हातात बेड्यांसह तो पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून पसार झाला. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
शहादा पोलिस ठाण्यात चोरीसह इतर गुन्हे दाखल असलेला ओमप्रकाश उर्फ ओमाराम किसनराव जाट (२५) या आरोपीला राजस्थान पोलिसांनी शहादा पोलिसांकडे सुपुर्द केले होते. त्याला सोमवार, ८ मे रोजी सायंकाळी शहादा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. पाच वाजेच्या सुमारास न्यायालयाजवळ एक पांढऱ्या रंगाची विना नंबरची कार येताच तो हातात बेड्या असताना अचानक कारमध्ये बसला. क्षणात कार सुसाट तेथून पसार झाली. पोलिसांनी लागलीच डोंगरगाव चौफुली, मध्यप्रदेश सीमा या भागात नाकाबंदी केली. परंतु उपयोग झाला नाही.