लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा विकास व सनियंत्रण समिती बैठकीत विविध योजनांचा आढावा घेण्यात येवून आलेला सर्व निधी खर्च करण्याच्या सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक शुक्रवार, 23 रोजी अध्यक्षा तथा खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेवून त्यावरील निधीची तरतूद आणि एकुणच खर्च याचा आढावा घेण्यात आला. बचत गटांचे तालुकानिहाय मेळावे घेण्यात यावे. दोन ते तीन दिवसांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण देखील घ्यावे. त्यासाठी मोठय़ा संस्था किंवा उद्योजकांना बोलविल्यास बचत गटांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल असेही खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले.वस्ती शाळा शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न शिक्षण विभागाने रखडत ठेवल्यामुळे खासदारांनी नाराजी व्यक्त केली. वनबंधू योजनेअंतर्गत आदिवासी महिलांच्या बचत गटांना महू फुलापासून बिस्कीट तयार करण्याचे प्रशिक्षण गडचिरोली येथे देण्यात आले. या युनिटसाठी धडगाव तालुक्यातील एका आश्रम शाळेतील जागेच्या ठिकाणी त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. परंतु आदिवासी विकास विभाग त्याला मंजुरी देत नसल्याची बाब समोर आली. येत्या आठ दिवसात याबाबत कार्यवाही झाली पाहिजे अशा सुचनाही खासदारानी दिल्या. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
निधी वेळेवर खर्च न झाल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:55 PM