लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापी-बुराई सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट करून शिंदखेडा तालुक्यातील दोन उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तापी बुराई योजना संघर्ष समितीचे निमंत्रक तथा पंचायत समिती सदस्य सतिष पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तापी-बुराई योजनेमुळे नंदुरबार, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील 100 पेक्षा अधीक गावांचा कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 1999 मध्ये या योजनेला मान्यता मिळाली आहे. परंतु काम अगदीच संथ गतीने सुरू आहे. निधीचीही कमतरता आहेच. त्यामुळे ही योजनेला गती देण्याची मागणी त्यांनी निवेदनात करण्यात आली. आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील या योजनेचे महत्व मुख्यमंत्र्यांना पटवून दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुराव करण्याचे आश्वासन दिले. शिवाय शिंदखेडा तालुक्यातील गुरुदत्त उपसा सिंचन योजना व म.फुले सिंचन उपसा योजना यांनाही लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तापी-बुराई योजना कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:38 PM