लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत चांगलीच चर्चा झाली. एखाद्या अपघाताची वाट पहात आहात काय? असा प्रश्न उपस्थित करून समाज कल्याण सभापती आत्माराम बागले यांनी या विषयाचे गांभिर्य सभागृहाच्या लक्षात आणून दिले. ‘लोकमत’ने शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा खोल्या व इमारतींबाबतचे सविस्तर आणि वस्तूनिष्ठ माहितीचे विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह सर्व विषय समिती सभापत व सदस्य उपस्थित होते. बैठकीत शिक्षक बदल्या, पाणी ेटंचाई, महिला बालकल्याण विभागाचा नियतव्यय यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत जिल्हा परिषदेच्या पडक्या शाळा इमारती आणि खोल्यांचा विषय निघाला. समाज कल्याण सभापती आत्माराम बागले यांनी हा प्रश्न उपस्थित केला. शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील शाळा इमारतींवर सचित्र वृत्त अर्थात विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बागले यांनी पडक्या इमारती व खोल्यांबाबत प्रशासनाने गंभीर व्हावे, अपघाताची वाट पहात आहात काय?, मुलांचे जीवाची काळजी नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी निर्लेखीत केलेल्या इमारती पाडण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तालुकानिहाय प्रपोजल मागवून कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले, प्रभारी उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी 296 शाळा खोल्या जिर्ण अवस्थेत असल्याची माहिती दिली. पुढील बैठकीत कार्यवाहीबाबत माहिती द्यावी असे सभापती बागले यांनी यावेळी अधिका:यांना बजावले. बैठकीत आंतरजिल्हा बदलीने विस्थापीत झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देतांना मोठय़ा प्रमाणावर गैरकारभार झाल्याचा आरोप सदस्य रतन पाडवी यांनी केला. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी समुपदेशनाची माहिती पदाधिका:यांना देखील दिली जात नसल्याचे सांगितले. या सर्व प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सीईओ गौडा यांनी शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली असतांनाही ते जिल्हा परिषदेच्या चकरा का मारतात असा प्रश्न शिक्षणाधिका:यांना विचारला. प्रभारी उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांना त्यांच्या गटशिक्षणाधिकारी पदस्थापनेवर तातडीने पाठविण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. प्रकाशा बॅरेजच्या पाण्याबाबत नियोजन करण्याची सुचना अभिजीत पाटील यांनी केली. शेडय़ूलप्रमाणे पाणी सोडले जाते किंवा कसे याची माहिती घ्यावी व तसे पत्र पाटबंधारे विभागाला द्यावे अशीही मागणी त्यांनी केली. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत निलीमा पावरा, सिताराम राऊत या सदस्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचलन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांनी केले.
बैठकीत महिला बालकल्याण विभागाच्या 80 लाखाच्या नियतव्यावर चर्चा करण्यात आली. त्यावर विविध योजनांसाठी किती व कसा निधी दिला जाईल याची चाचपणी करण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी 36 लाख रुपये, अंगणवाडी बांधकामासाठी 10.37 लाख रुपये, व्हीसीडीसीसाठी एक कोटी रुपये तर पाळणा घरांसाठी 22 लाख रुपये नियतव्ययाअंतर्गत मंजुर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.