लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील बोरद येथे एकाच दिवशी तब्बल २०० वराह मेल्याचा खोडसाळपणे फोन थेट पशुसंवर्धन आयुक्तांना गेल्यानंतर ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीच या विभागाची स्थानिक यंत्रणा खडबडून जागी झाली व गाव गाठले होते. तेथे गेल्यानंतर असा कोणताच प्रकार घडलेला नव्हता; परंतु पथकाला पाहून गावकरीदेखील अवाक् झाले होते. गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, पथकाने गावकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र, अफवांमुळे कर्मचारी हैराण झाले होते. असा खोडसाळपणा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तळोदा तालुक्यातील बोरद येथे शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल २०० वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याचा फोन थेट पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांना करण्यात आला होता. साहजिकच ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ आरोग्य यंत्रणेने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला व या विभागाने स्थानिक पशुसंवर्धन विभागाला अशा फोन आल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या विभागाचे वैद्यकीय पथक रात्रीच बोरद गावात दाखल झाले होते. हा प्रकार ज्या ठिकाणी घडल्याचे सांगण्यात आले होते, तेथे घटनेची पाहणी केली असता असा कुठलाच प्रकार पथकाला आढळून आला नाही. पथकाने संपूर्ण गावात पाहणी केली. प्रत्यक्ष गावकऱ्यांनाही विचारणा केली असता गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, अशा खोडसाळपणामुळे आरोग्य कर्मचारी हैराण झाले होते. केवळ दोन वराह मृत्युमुखी पडल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी पुन्हा पथकाने गावऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. शिवाय ‘बर्ड फ्लू’बाबत खबरदारी घेऊन जागृती करण्याचे आवाहनही केले. अशा अफवा कोणी पसरवू नयेत. आधीच बर्ड फ्लू विषयी लोकांमध्ये कमालीची भीती आहे. यापुढे अशा अफवा कोणी पसरविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
वराहांच्या बंदोबस्ताबाबत यंत्रणा घेत नाही ठोस भूमिकाशहाराबरोबरच ग्रामीण भागात वराहांचा मोठा वावर आहे. शिवाय या मोसमात वराहांचा अचानक मृत्यू कुठेना कुठे होत आहे. बर्ड फ्लूच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आधीच कोरोनाची भीती आहे. त्यात आता बर्ड फ्लूची भर पडली आहे, असे असताना वराहांच्या वाढत्या उपद्रवाबाबत ग्रामपंचायती व नगर पालिका प्रशासनाने ठोस अशी भूमिका घेतली नसल्याचा आरोप आहे. त्यांच्या अशा भूमिकेमुळे वराह पालकांचे फावत आहे. केवळ तेवढ्यापुरता दिखावा करीत पुन्हा ‘जैसे थे’ चित्र होते. वास्तविक या साथींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ महसूल प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कारण आजही शहराबरोबरच ग्रामीण भागातही वराहांची संख्या मोठी आहे. वराह मालकही आपल्या वराहांना लसीकरण करण्यास पशुआरोग्य यंत्रणेला सहकार्य करायला तयार नाहीत. दरम्यान, बोरद गावातील संपूर्ण वराहांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय शासनाच्या सर्वच यंत्रणांना खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
बोरद गावात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात वराहांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे वरिष्ठ अधिकात्याने कळविले होते. त्यानुसार स्थानिक वैद्यकीय पथकाला तात्काळ घटना स्थळी पाठविले होते. तथापि, गेल्या आठवड्यात दोन वराह मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. - डॉ.यु.डी. पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी,जिल्हा परिषद नंदुरबार