लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना अॅड.पाडवी यांनी सांगितले, नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू व्हावे यादृष्टीने आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे. तशा सुचना बैठकीत देण्यात आल्या. शासन स्तरावरील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होईल. त्यादृष्टीने महाविद्यालयास मान्यता देण्याबाबतच्या केंद्रीय समितीने निर्देशित केलेल्या त्रुटींची पुर्तता युद्धपातळीवर करावी. महाविद्यालयासाठी आवश्यक पदभरतीबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आवश्यक तांत्रिक बाबींची पुर्तता करण्यासठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. अशा सुचना देण्यात आल्याचेही अॅड.पाडवी यांनी यावेळी सांगितले. आदिवासी क्रिडा अकादमी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी क्रिडा विभागाचा बजेट कमी होता. आता वाढविण्यात आला असल्याने त्या माध्यमातून क्रिडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयात येत्या वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करणार- मंत्री पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:31 PM