नंदुरबार : २००६ मधील बर्ड फ्लूच्या कटू आठवणींची धास्ती जिल्हावासीयांनी पुन्हा घेतली आहे. चिकन विक्रीवर १५ ते २० टक्के परिणाम झाला आहे. पोल्ट्री फार्मधारकांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कुठलाही धोका नाही. त्यामुळे अफवा पसरवू नये. जिल्हा प्रशासनाचे या बाबीकडे लक्ष असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात २००६ मध्ये बर्ड फ्लू आला होता त्यावेळी नवापूरसह जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री फार्ममधील पक्षी दगावले होते. त्यातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. साधारणत: वर्षभर हा व्यवसाय रुळावर येण्यास लागला होता. आतादेखील देशातील काही राज्यांत बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात देखील त्याबाबत सतर्कता बाळगली जात आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने त्यासाठी पोल्ट्री फार्मधारकांना आवाहन केले आहे. आवश्यक त्या उपाययोजना करणे आणि तशी काही लक्षणे आढळल्यास तातडीने कळविण्याचे सूचित केले आहे. जिल्हावासीयांनी देखील याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान, चिकन व अंडी विक्रीवर काहीसा परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
n हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरीत्या उद्भवतो; परंतु तो पाळीव कोंबड्यांमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस १६५ अंशावर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. पोल्ट्री फार्मधारकांना वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.