आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना सरकारकडून अनुदान देखील देण्यात येते. याशिवाय जाहिराती व पोस्टर, बॅनरद्वारेदेखील जनजागृती केली जात आहे. मात्र, आज ही समाजात आंतरजातीय विवाहांना पाहिजे तेवढी मान्यता दिसून येत नाही. आंतरजातीय विवाहासाठी उच्चशिक्षित समाज पुढे आला आहे. याचा प्रत्यय नंदुरबार येथे पार पडलेल्या आंतरजातीय सत्यशोधक विवाहामुळे पुन्हा एकदा आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील युवक संजय दुसाद व नंदुरबार येथील युवती रिना निकुंभ या दोघांनी एकमेकांच्या पसंतीने आंतरजातीय विवाह करण्याचे ठरविले. त्याला दोन्ही परिवारांची देखील संमती होती. संजयच्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे तर रिना ही परिचारिका म्हणून रुग्णालयात काम करीत असून, दोघेही स्वतःच्या पायावर उभे आहेत. आंतरजातीय व आंतरधर्मीय, सत्यशोधकी विवाह लावून देण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम असल्याची माहिती या दोघांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंनिसच्या नंदुरबार शाखेकडे अर्ज देऊन आंतरजातीय विवाह लावून देण्यासाठी मदत व मार्गदर्शनाची विनंती केली होती.
दरम्यान, कायदेशीर व वैद्यकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या नंदुरबार शाखेच्या वतीने दोघांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले यांचे ‘अखंड वाचन’, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाची प्रत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, मंगलगीत गायन केले. नंतर एका कुंडीत दोघी दाम्पत्याच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सीताफळाचे झाड लावण्यात आले. त्या झाडाभोवती सप्तपदी (फेऱ्या) घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीला नवदाम्पत्याकडून वचने वदवून घेतली. दोघांनी वैयक्तिक व सामूहिक शपथ ग्रहण करून घेतली व दोघांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. अशाप्रकारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार शाखेच्या वतीने आगळावेगळा व अत्यंत साध्या पद्धतीने सत्यशोधकी विवाह लावून देण्यात आला.
या विवाह सोहळ्याला वर व वधूकडील निवडक कुटुंबीय व नातेवाईकदेखील उपस्थित होते. या आंतरजातीय सत्यशोधकी विवाहासाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार अंनिस शाखेचे शांतीलाल शिंदे, ॲड. प्रियदर्शन महाजन, फिरोज खान, कीर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी, शहादा शाखेचे, संतोष महाजन, प्रदीप केदारे यांनी परिश्रम घेतले.
अंनिसच्या वतीने ७०० हून अधिक विवाह
जातीपातीच्या बाबतीत आजही समाजात भेद अभाव दिसून येतो. जातीबाहेर लग्न केल्यामुळे अनेक कुटुंबांना वाळीतही टाकले जाते. समाजातील जाती-पातीचा भेदभाव नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह महत्त्वाचे माध्यम असल्याचे मानून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आतापर्यंत राज्यभरात सातशेहून अधिक आंतरजातीय-आंतरधर्मीय व सत्यशोधक नोंदणी पद्धतीने विवाह लावून देण्यात आले आहेत. नंदुरबार शाखेच्या लावून देण्यात आलेला हा पहिला आंतरजातीय व सत्यशोधक विवाह होता. यापुढे देखील अंनिसच्या वतीने जिल्ह्यात या क्षेत्रात काम केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला कायदेशीर, वैद्यकीय व सर्व बाबतीत मदत आणि मार्गदर्शन अंनिसच्या वतीने केले जात असून, त्यासाठी महाराष्ट्र अंनिसचा स्वतंत्र विभाग कार्यरत असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी दिली आहे.