ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.11 : शहरात शनिवारी सकाळी उसळलेल्या दंगलीनंतर रविवारी परिस्थिती सर्वसामान्य झाली. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेसह सर्वच भागातील दुकाने नेहमीप्रमाणे उघडली. नुकसानग्रस्तांच्या पंचनाम्याचे काम दिवसभर सुरू होते. पोलिसांनी दंगलीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.
शनिवारी सकाळी शहरातील मंगळबाजारासह अनेक भागात दंगल उसळली होती. पोलिसांनी दोन तासात दंगल आटोक्यात आणली. दंगलीत तोडफोड, लुटालुट आणि जाळपोळीत अनेक घरांचे, दुकानांचे व वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शहरात रात्री उशीरार्पयत तणावाचे वातावरण होते. रविवारी मात्र सकाळपासूनच व्यवहार सर्वसामान्य झाल्याचे चित्र होते. मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्वच भागातील व्यापारी प्रतिष्ठाने उघडली होती. रिक्षा, बस वाहतूक देखील सुरळीत होती. त्यामुळे दंगलीची कुठलीही दहशत किंवा भिती रविवारी दिसून आली नाही. असे असले तरी पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला. दंगलग्रस्त भागासह संवेदनशील भागात वाढीव बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून 70 ते 80 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 25 जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू होते. स्थानिक नेत्यांनी दंगलग्रस्त भागाची पहाणी केली.