शहादा : स्थायी समितीचे गठण होण्यापूर्वीच 24 तास अगोदर समितीच्या सदस्यांना बैठकीचा अजेंडा काढण्याचा ‘प्रताप’ पालिका प्रशासनाने केला आहे. आचारसंहिता लागू असताना सभा बोलावण्यात आली आहे. काँग्रेस व एमआयएमच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.पालिकेच्या विषय समित्यांसह नगराध्यक्ष पदसिद्ध सभापती असलेल्या स्थायी समितीची सभा शुक्रवार, 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बोलावण्यात आली आहे. या सभेचा अजेंडा प्रशासनाने 6 जानेवारीला पाठविला असून, तो समितीच्या 10 सदस्यांना गुरुवारी दुपारी प्राप्त झाला. विषयपत्रिकेवर पालिकेचा वर्ष 2017-18 चा अर्थसंकल्प हा एकमेव विषय असून 76 पानी अजेंडा आहे.विशेष म्हणजे पालिकेची स्थायी समिती 7 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता गठित झाली होती. या समितीत सत्ताधारी भाजपाचे दोन, काँग्रेसचे सहा व एमआयएमचे दोन असे संख्याबळ आहे. सत्ता भाजपाची असली तरी समितीत आठ सदस्य विरोधी गटाचे आहेत. असे असतानाही प्रशासनाने 6 जानेवारीला म्हणजे समिती गठण होण्याच्या 24 तासांपूर्वी काढल्याने पालिका वतरुळात चर्चेचा विषय झाला आहे. पालिकेच्या कोणत्याही सभेचा अजेंडा किमान तीन दिवस आधी देणे आवश्यक आहे. एक दिवस आधी नगरसेवकांच्या हातात पडल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची पहिलीच बैठक होत असताना प्रशासनाकडून अशी चूक झाल्याने विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. (तालुका प्रतिनिधी)अजेंडा नियमानुसारच आहे. अर्थसंकल्प तातडीने मंजूर करणे आवश्यक असल्याने ही बैठक घेण्याची गरज आहे. अजेंडय़ावरील 6 जानेवारीचा उल्लेख ही प्रशासनाची चूक आहे. तांत्रिक दोष असू शकतो. -मोतीलाल पाटील, नगराध्यक्ष, शहादा
गठण होण्यापूर्वीच सदस्यांना बैठकीचा अजेंडा
By admin | Published: January 12, 2017 10:37 PM