पोलिसांकडून या चोरीचा तपास सुरू असल्याने नेमकी कारवाई करावी, याबाबत जिल्हा परिषदेतूनच निर्णय होत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान मोठमोठे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कागदपत्रांची चोरी करणारे मिळून येत नसल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना संपर्क केला असता, अक्कलकुवा ग्रामपंचायतीत नेमके काय चोरीला गेले, हेच स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर काय ती कारवाई होईल, चोरीमुळे लेखापरीक्षणही थांबले आहे. पोलीस तपास पूर्ण करण्यात आल्यानंतरच पुढील कारवाई शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली.
सील तोडून कामकाज
लेखापरीक्षण करावयाचे असल्याने ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी अक्कलकुवा ग्रामपंचायत कार्यालय सील करण्यात आले होते. या सीलमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता चोरीचा तपास लागत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज सीलबंद कार्यालयात करावे किंवा बाहेर असा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीतील गोंधळामुळे याठिकाणी कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.