लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : ग्रामपंचायतीत चार कोटी ७५ लाख रूपयांचा खर्च शासकीय नियमांनुसार नसल्याचा प्रकार चाैकशी समितीने उघडकीस आणला होता. यातून नोटीसा देवूनही योग्य ते खुलासे न आल्याने जिल्हा परिषदेकडून आजी-माजी सरपंच तथा प्रशासकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी सर्व ९ जणांना अंतिम नाेटीसा देण्यात येणार आहेत. २०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत नियुक्त ग्रामसेवक, प्रशासक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी शहरात केलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप व तक्रारी सातत्याने होत होते. यांतर्गत मे २०२० मध्ये गटविकास अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर या प्रकाराचे गांभिर्य समोर आले होते. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांच्या मार्गदर्शनात चार जणांची चाैकशी समिती गठीत करुन तपास सुरु करण्यात आला होता. दरम्यान चार वर्षाच्या काळात १४ वा वित्त आयोग व पाच टक्के पेसा निधीचा हिशोब नसल्याचे समोर आले होते. समितीने नोव्हेंबर २०२० मध्ये ३१ पानी चाैकशी अहवाल जिल्हा परिषदेला दिला होता. परंतू यावर कारवाई होत नसल्याने पुन्हा तक्रारी सुरु झाल्या होत्या या तक्रारींची दखल घेत याप्रकरणात चाैकशी झालेल्या सर्व ९ जणांना सोमवारी अंतिम नोटीस देण्यात येणार आहे. दरम्यान यापूर्वी देण्यात आलेल्या नोटीसांमध्ये योग्य त्या पद्धतीने खुलासे न मिळाल्याची माहिती आहे. सोमवारी काढण्यात येणा-या नोटीसा संबधितांना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु होणार आहे.
कागदपत्रे मिळेनातचार सदस्यीय समितीने ग्रामपंचायतीत केलेली कामे, ई-टेंडरिंग, दरपत्रक, एमबी, कामांचे ईस्टीमेट, ग्रामसभांची मंजूरी यांची तपासणी केली होती. यात अनेक तफावती आढळून आल्या होत्या. समितीने एकूण चार कोटी ७५ लाख रूपयांचा हिशोब नसल्याचे ३१ पानी अहवालातून समोर आणले होते.
उपोषणाच्या तयारीत नोव्हेंबर महिन्यात देण्यात आलेल्या अहवालावर कारवाई होण्यास विलंब होत असल्याने अक्कलकुवा शहरातून तक्रारी वाढल्या होत्या. यातून २५ जानेवारीपासून काहींनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच विविध राजकीय पक्षांकडून राज्यपातळीवर या प्रकाराची चाैकशीसाठी पाठपुरावा सुरु होता.
यांना द्यावा लागणार पुन्हा खुलासा समितीने २०१६ मध्ये सरपंच असलेले अमरसिंग हुपा वळवी, डिसेंबर २०१६ पर्यंतचे प्रशासक आर.एम.देव, मार्च २०१७ पर्यंतचे प्रशासक जे.एस.बोराळे, २०१७ ते २०१९ यादररम्यान लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा, २०१९ मधील उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, जून २०१९ पासून लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी इंद्रवदन वळवी, २०१५ ते २०१८ या काळातील ग्रामविकास अधिकारी व्ही.बी.जाधव, २०१८ ते २०१९ दरम्यानचे ग्रामविकास अधिकारी आनंदा पाडवी, २०१९ ते २०२० पर्यंत ग्रामसेवक एस.आर.कोळी यांना यापूर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. पहिल्या नोटीसीचे उत्तर मिळाल्यानंतर त्यात अनेक बाबींची स्पष्टता नसल्याने दुस-यांना नोटीस दिली जाणार आहे. यातून योग्य ते समाधान झाल्यास गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे.