लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील जुन्या महादेव गल्लीतील ५४ वर्षीय पुरूष व प्रतापपूर येथील ६२ वर्षीय पुरूष कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. कोरोना पॉझिटीव्ह ७२ वर्षीय पुरूषाचा शनिवारी रात्री नंदुरबार येथे व कोरोना संसर्गमुक्त झालेल्या अन्य ७२ वर्षीय पुरूषाचा रविवारी दुपारी सुरत येथे मृत्यू झाल्याने शहराच्या चिंतेत भर पडत आहे.दोन दिवसाआधी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे शहरातील नारायणपूर रोड वरील ७२ वर्षीय वृद्ध पुरूषास बारडोली येथे नेण्यात आले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय नंदुरबार येथे पाठविण्यात आल्यावर त्यांचा पहिला स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचे निधन झाले. मृत्यू पश्चात त्याच्या दुसऱ्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला. सिव्हील हॉस्पीटलच्या पथकाकडून शहरात शनिवारी मध्यरात्री त्याचा दफनविधी पार पाडला. नारायणपूर रोडवरील तो भाग सील करून प्रशासनाने तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करीत मयताच्या परिवारातील सदस्यांना व रूग्णवाहिकेच्या चालकाची विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.शहरातील महादेव गल्लीतील दोघांचा पहिला स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यापैकी ५४ वर्षीय पुरूषाचा अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविताच जुनी महादेव गल्लीचा भाग सील करून कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या परिवारातील सदस्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी व सहकारी यांनी नागरिकांना कंटेनमेंट झोनचे पालन करण्याची ताकीद दिली.कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने सुरत येथे उपचार घेत असलेले शहरातील राजीवनगर मधील ७२ वर्षीय वृद्ध पुरूष शनिवारी कोरोना संसर्गमुक्त झाले होते. संसर्गमुक्त झाल्यानंतर रविवारी दुपारी त्याचे निधन झाले. कोरोनाच्या धर्तीवरच त्याच्या शवाचा दफनविधी सोहळा रात्री उशिरा पार पडला.शहरी भागातील कोरोनाचे लोण ग्रामीण भागातही पाय पसरवित आहे. पिंपळनेर रस्त्यावर असलेल्या प्रतापपूर या गावातील ६२ वर्षीय पुरूष कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून दुपारी प्राप्त झाल्याने गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे यांनी प्रतापपूर गावात हजेरी लावली. तेथे थांबून गावात औषध फवारणी व रूग्णाच्या घराजवळील भाग सील करून कंटेनमेंट झोन जाहीर करण्यासह रूग्णाच्या संपर्कातील व त्याच्या परिवारातील सदस्यांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची कार्यवाही पूर्ण केली.शहरातील भिमनगर मधील ७२ वर्षीय वृद्ध आजीच्या पॉझिटीव्ह अहवालानंतर शहरात दोन व ग्रामीण भागातील एक असे कोरोना पॉझिटीव्ह तीन रूग्ण वाढल्याने ही संख्या आता दोन आकडी होवून ११ झाली आहे. पैकी शहरातील दोन व ग्रामीण भागातील एक असे तीन रूग्णांचा मृत्यु झाला आहे. एॅक्टीव्ह रूग्ण संख्या पाच तर बरे झालेल्या रूग्णांची संख्या तीन आहे.नवापूरच्या विलगीकरण कक्षात दाखल लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा व इतरांचाही बचाव करा, त्यासाठी सर्वप्रथम बाहेरगावी जाणे टाळा, सोशियल डिस्टन्सिंचे पालन करा, सॅनिटायझर व मास्कचा महत्तम वापर करून शासन व अधिकारी यांच्याकडून देण्यात येणाºया सूचनांचे पालन करा असे आवाहन तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, निवासी नायब तहसीलदार कोकणी यांनी केले आहे.
नवापुरात रूग्णसंख्या वाढत चालल्याने ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 1:50 PM