नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर काही वर्षांत साक्री रस्त्यालगत विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेवर जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेकडो नागरिकांचा याठिकाणी राबता असल्याने या परिसरात इतर व्यवसायही सुरू झाले आहेत. दरम्यान, गेल्या १० वर्षांत या व्यावसायिकांनी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वारच काबीज केल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी प्रामुख्याने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विविध खाद्यपदार्थ आणि इतर गरजेचे साहित्य याची विक्री करण्यात येते. यातून सकाळी आणि रात्री या दुकानांवर होणारी गर्दी इतर वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाने वेळावेळी संबंधितांना सांगूनही त्यांनी योग्य त्याप्रकारे ओटे तयार केलेले नाहीत. या व्यवसायांवर अनेकांचा उदरनिर्वाह चालत असल्याने रुग्णालय प्रशासनाने त्यांना वेळोवेळी समज दिली आहे. सकाळच्यावेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास याठिकाणी मोठी अडचण निर्माण होते. रुग्ण चहा, नाश्त्यासाठी बाहेर आलेले असल्याने गर्दी होवून कोंडी होते. सोबत याठिकाणी रिक्षाही उभ्या राहत असल्याने अडचणी वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. यातून आरोग्य प्रशासनाकडून याबाबत योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे. येथील व्यावसायिक हे १० वर्षांपासून याठिकाणी आहेत. परंतु, येत्या काळात वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीनंतर या भागाची वेगळी ओळख होवून गर्दीतही वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आधीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. परंतु, बहुतांश रुग्णवाहिका ह्या मुख्य प्रवेशद्वाराने अपघात विभागाकडे जातात.
कोरोना वाॅर्डकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका केवळ दुसऱ्या प्रवेशद्वाराने जातात. येथील तिसरे प्रवेशद्वार मात्र रुग्णालय प्रशासनाने बंद ठेवले आहे.