लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : ग्रामपंचायतींच्या बँक खात्यातील रक्कम तांत्रिक प्रक्रियेमुळे काढता येत नसल्यामुळे झालेल्या विकासकामांची बिलेदेखील थकली आहेत. सर्वच ग्रामपंचायतींना त्याचा फटका बसला असून, या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकाऱ्यांकडे आजी, माजी सरपंचांनी केली आहे.
तळोदा पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी म्हणून प्रभाकर कोकणी यांची नियुक्ती शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकतीच केली आहे. शिवाय त्यांनी गेल्या आठ ते १० दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा पदभारदेखील हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गटविकास अधिकारी कोकणी यांची भेट घेतली. प्रारंभी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रभावी प्रशासकीय नियोजनाअभावी ग्रामपंचायतीबरोबरच ग्रामस्थांना व लाभार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या ग्रामसेवकांना नियमितपणे गावास भेट देण्याची सूचना द्यावी. त्याचबरोबर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या ग्रामपंचायत भेटीचे वेळापत्रक तयार करून त्यांना ताकीद द्यावी, अशा वेगवेगळ्या सूचना मांडल्या. वास्तविक तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना प्रशासकाची नियुक्ती करून साधारण दीड महिना उलटत आला आहे. तरीही ग्रामपंचायतींचे डी एस पी मॅपिंग अद्याप झालेले नाही. साहजिकच यामुळे तांत्रिक प्रक्रिया रखडली आहे. परिणामी ग्रामपंचायतींना आपल्या बँक खात्यातील रक्कम काढता येत नाही. त्यामुळे झालेल्या विकासकामांची बिले संबंधितांना अदा करता येत नाहीत. त्यांची बिले रखडल्याने ते सारखे चकरा मारत असतात. ही टेक्निकल प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सक्त ताकीद द्यावी. याबरोबरच तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे अंतिम हप्ते बाकी आहेत. त्यासाठी ते पंचायत समितीकडे सारखे हेलपाटे मारत असतात. तरीही संबंधित त्यांना दाद देत नाही. शिवाय पंचायत समितीमार्फत सुरू असलेल्या लाभार्थ्यांच्या गोठ्यांचे हप्ते थकले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रश्नांबाबत गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी बळीराम पाडवी, यशवंत पाडवी, शानूबाई वळवी, सरपंच प्रताप नाईक, कैलास पाडवी, महेंद्र पवार, राजेंद्र पाडवी, कागडा पवार, राजू पुजारी, जयवंत पाडवी, विमलबाई पाडवी, विनोद खर्डे, किरण वसावे, सरवरर्सिंग वसावे आदी उपस्थित होते.
आजी,माजी सरपंच यांच्या बैठकीचे नियोजन
पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील सरपंचांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर येत्या ६ ऑक्टोबर रोजी संबंधित विभाग प्रमुख व आजी, माजी सरपंच यांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबत ठोस उपाययोजना करून तक्रारीचे निवारण करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत तक्रारी केल्या होत्या. शिस्त लावण्याची मागणी केली होती.
ग्रामपंचायतींच्या विकासकामांबरोबर लाभार्थ्यांच्या विविध योजनांच्या अडचणी होत्या. या समस्या सरपंचांनी नूतन गटविकास अधिकारी यांच्यापुढे मांडल्या. त्यांनी याविषयी सकारात्मक चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. - बळीराम पाडवी, माजी तालुकाध्यक्ष सरपंच संघटना, तळोदा.
फोटो : तळोदा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी प्रभाकर कोकणी यांनी पदभार स्वीकारलानंतर त्यांचे स्वागत करताना सरपंच संघटनेचे पदाधिकारी.