नंदुरबार : शहादा तालुक्यातील लांबोळा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. एका घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुसरे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. शहादा येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक नरेंद्र सजन पाटील यांच्या लांबोळा येथील वडिलोपार्जित घरात हा चोरीचा प्रकार घडला आहे. नरेंद्र पाटील यांच्या आई या घरात एकट्याच राहत होत्या.
सोमवारी सायंकाळी नरेंद्र पाटील यांनी वृद्ध आईला शहादा येथे घरी बोलावून घेतल्याने हे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्र ते मंगळवारी पहाटेदरम्यान घरात प्रवेश करुन कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. या दागिन्यांची किंमत ७ लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र पाटील यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी याच भागातील सुरेखा विठ्ठल पाटील यांच्या बंद घराकडे मोर्चा वळवला. सुरेखा पाटील ह्या कामानिमित्त बडोदा येथे गेल्याने त्यांचे घर बंद होते. या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी या ठिकाणाहून ६ हजार रुपये रोख चोरून नेल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल आहे.