रमाकांत पाटील/नंदुरबार
नंदुरबार : बाजारात खरेदीसाठी गेेलेल्या वृद्धाच्या अंगावर वीज तार पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना अक्कलकुवा येथे सकाळी घडली. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिलापचंद केसरीचंद जैन (७५) रा. अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. अक्कलकुवा शहरातील बाजार रस्त्यावर असलेल्या चामुंडा किराणा दुकानासमोरून जैन हे भाजी बाजारात जात असताना अचानक त्यांच्या अंगावर विजेची तार पडली. त्यामुळे त्यांना विजेचा जबर झटका बसला. त्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. जर्मनसिंग पाडवी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याबाबत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात प्रदीप जसराज जैन यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक महेश माळी यांनी भेट दिली. शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकुवा शहरात ठिकठिकाणी लोंबकळणाऱ्या व जीर्ण वीज तारा आहेत. त्या कधीही तुटून पडण्याची शक्यता आहे. वीज कंपनीने तारा बदलाव्या, अशी मागणी होत आहे.