शेतकरी सर्वच बाबतीत नाडला जातो असे म्हटले जाते. परिस्थतीदेखील तशीच आहे. नंदुरबारातील बाजारात असाच एक किस्सा घडला. एका शेतकऱ्याने शेतातून थेट बाजारात भुईमूग शेंगा विक्रीसाठी आणल्या. थेट बाजारात आणल्यामुळे भावदेखील कमी होता. परंतु तरीही त्याच्याकडे येणारे ग्राहक भाव करीतच होते. शेतकरीदेखील सर्वांनाच तोंड देत शेंगा विक्री करीत होता. एक चिकित्सक ग्राहक त्याच्याकडे आला आणि त्याने शेंगांच्या भावाबाबत घासघीस सुरू केली. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने त्या ग्राहकाला सुनावली. काय हो साहेब... मोबाइलला रिचार्ज मारतात तेव्हा रिचार्ज महिन्याचा असल्याचे कंपनी सांगते, परंतु नेमका किती दिवसाचा असतो २८ दिवसांचा ना... दोन दिवस तुमचे तोट्याचेच ना... सरकार प्रत्येक आदेशात आठवडा म्हणते, पण सरकारी कार्यालयेच पाच दिवस सुरू राहतात, दोन दिवसांचे काय? पॅकिंग तेलाचे वजन एक किलो सांगतात प्रत्यक्षात २० ते ४० ग्रॅम कमी असते ना... तेव्हा कुठे जातो तुमचा नफा-तोटा, कुठे जाते तुमची घासघीस, शेतकऱ्याने काही माल विक्रीस काढला तर लागलीच माल महाग वाटतो... सांगा काय म्हणने आहे तुमचे? असा प्रश्न शेतकऱ्याने ग्राहकाला उपस्थित केला. ग्राहक तर निरुत्तर झालाच; पण उपस्थित इतर ग्राहकांनीही शेतकऱ्याला दाद देत गपगुमान आहे त्या भावात शेंगा खरेदी केल्या.
-मनोज शेलार