ब्राह्मणपुरी : राज्यात २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाचा गोंधळ कायम असून, त्यामुळे जवळपास नंदुरबार जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना, आर्थिक भुर्दंड बरोबरच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास हजारो विद्यार्थ्यांनी आरोग्य विभाग गट क, ड भरतीच्या परीक्षासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यासाठी परीक्षार्थींचा परीक्षा केंद्र शेकडो किलोमीटर लांब आल्याने एक दिवस आदी केंद्र गाठले होते. त्याचबरोबरीने त्यांना राहण्यासाठी रूमदेखील करावे लागले होते. यासाठी पालकांची आपल्या पाल्याना परीक्षा जाण्यासाठी उसवणारी पैसे घेऊन जाण्याची सोय केली होती. परंतु अचानक एक दिवसा आधी रात्री विद्यार्थ्यांना मेसेज येतो की, उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाली असून, पुढील तारीख कळविण्यात येणार. हा मेसेज विद्यार्थ्यांना आल्यावर एकच गोंधळ उडाला व विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. काही विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अर्ध्या रस्त्यातच उतरून बस स्थानकावरच रात्र काढून सकाळी परतावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
नवरदेव मंडपात नवरी फरारची गत
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूर्व नियोजन करून परीक्षा केंद्र गाठले होते. सकाळी उठून परीक्षा देऊ असे देखील मनात घर करून होते. परंतु एका कंपनीने परीक्षा घेण्यास असमर्थता दाखवल्याने ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्याने नवरदेव मंडपात नवरी फरार ची गत झाल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. ज्या कंपनीमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला, आर्थिक भुर्दंड सोसावा लागला, ती कंपनी नेमकी कुणाची, कुठली, जर कंपनी परीक्षा घेण्यास असमर्थ होती तर तिला कंत्राट का दिला?, असे प्रश्न आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.
काही विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्र ‘चीन’
आरोग्य विभागाच्या गट ‘क’साठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. काही विद्यार्थ्यांना चक्क ‘चीन’ या देशातील काही शहरांमधील तर काही विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशात परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संबंधित विभागाचा सावळा गोंधळाकडे प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
आता परीक्षा कधी होईल
ऐन वेळी रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत येणाऱ्या काळात परीक्षा कधी होईल, कशी होईल असे विविध प्रश्न परीक्षार्थींना पडला असून, संबंधित विभागाने याचा खुलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे.
माझा परीक्षासाठी नंबर अहमदनगर येथे आला होता. मी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी उसनवारीने पैसे घेऊन परीक्षा देण्यासाठी निघालो होतो परंतु अचानक रात्री १० वाजेच्या सुमारास आरोग्य विभागाची गट क व ड च्या संवर्गाची परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळताच धक्काच बसला. त्यामुळे अर्ध्या रस्त्यात उतरून बसस्थानकाला मुक्काम करावा लागला. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. - प्रकाश उखळदे, परीक्षार्थी, सुलतानपूर, ता. शहादा