अनमोलने यापूर्वीदेखील विविध स्पर्धेत क्रीडा कौशल्याच्या बळावर यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याला २०१९ मध्ये आदिवासी रत्न व २०२० मध्ये क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तो सध्या महाराष्ट्र राज्य एरिअल स्पोर्टचे पंच म्हणून काम पाहत आहे. त्याने मूळगावी स्थापन केलेल्या बिरसा मुंडा अकादमीच्या माध्यमातून ग्रामीण भागात योगा, मल्लखांब, जिग्मस्टिक व एरिअल स्पोर्टचे धडे गिरवत आहे. त्याला पथराई सैनिकी विद्यालयातील शांताराम मांडाले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गो.हु.महाजन व शी.ल. माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील प्राचार्य डाॅ.शशिकांत मगरे, क्रीडा शिक्षक प्रशांत बोगे व प्रा.संजयकुमार शर्मा याचेदेखील मार्गदर्शन मिळाले.
त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, अक्कलकुवा तालुक्यातील गिर्यारोहक अनिल वसावे यांना आफ्रिका खंडातील सर्वांत उंच शिखर असलेले किली मांजरोवर चढाई करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने दिलेल्या आर्थिक मदतीच्या पाठबळाप्रमाणेच जर आपल्यालाही आर्थिक मदत मिळाली तर बिरसा मुंडा स्पोर्ट अकादमीच्या माध्यमाने ग्रामीण भागात गुणवत्ताधारक खेळाडू निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळेल.