तळोदा : येथील खान्देशी गल्लीतील अण्णा गणेश मंडळाने गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवून शहरात लोकाभिमुख उपक्रमांची परंपरा कायम ठेवली आहे. यात शहरातील गरजू व निराधार नागरिकांना नैवेद्य फाउंडेशनच्या माध्यमातून घरपोच अन्नधान्याची किट वाटप केली; तर दुसऱ्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल रुग्णांना फळवाटप करण्यात आले. त्यामुळे मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे.
अण्णा गणेश मंडळाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, मंडळाचे अध्यक्ष बालू राणे, उपाध्यक्ष अतुल सूर्यवंशी, सचिव अरुण कर्णकार व मंडळाचे कार्यकर्ते संतोष माळी, हिरालाल कर्णकार, सुनील सूर्यवंशी, भगवान कर्णकार, मोहन कर्णकार, अंबालाल चव्हाण, किरण सूर्यवंशी, सुनील कर्णकार, भरत कर्णकार, मुकुंदा महाजन, आदी कार्यकर्ते विविध उपक्रम राबवून गरजूंना सेवा देत आहेत.
दरम्यान, दरवर्षी गणपती स्थापनेच्या दिवशी नैवेद्य फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील निराधार व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप अण्णा गणेश मंडळामार्फत करण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष बालू राणे यांनी जाहीर केले. त्यामुळे मंडळाच्या या लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करण्यात येत आहे.