नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींची मुदत १८ जुलै २०२१ ला संपत आहे. त्यामुळे साहजिकच विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षाचा कालावधी देखील संपला आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकाच्या नियुक्तीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी शुक्रवारी तसे आदेश देखील काढले आहेत. सर्वात जास्त ग्रामपंचायती तळोदा तालुक्यात ३५, अक्कलकुवा १३ तर धडगाव तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये बोरद, वाण्याविहीर, तोरणमाळ, प्रतापपूर, मोदलपाडा, चिनोदा, आमालाड या मोठ्या ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे. या ग्रामपंचायतींमधील वॉर्ड रचना आधीच पूर्ण करण्यात आली आहे. साहजिकच निवडणूक आयोग आता केव्हा निवडणुका घेते याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.
प्रशासकांपुढे कामकाजाचे आव्हान
जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने जिल्हा परिषदेने त्यांच्यावर प्रशासकाची नियुक्ती केली असली तरी प्रशासकांना अपला कार्यभार सांभाळण्याचे आव्हान कायम आहे. कारण आधीच पंचायत समित्यांमध्ये वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची प्रचंड वाणवा आहे. त्या कर्मचाऱ्यांना एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे कामकाज दिले आहे. साहजिकच त्यांच्यापुढे कामाचा ही मोठा ताण वाढला आहे. विशेषतः तळोदा तालुक्यात हे चित्र पहावयास मिळत आहे. आधीच सातपुड्यातील ग्रामीण दऱ्याखोऱ्यात तालुका पसरला आहे. याशिवाय अनेक ग्रुप ग्रामपंचायती समाविष्ट आहेत. त्यामुळे काम करताना प्रशासकांची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यातही आता दहावी-बारावीचे निकाल लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने याबाबत प्रशासकांना गावात नियमित जाणे सक्तीचे आहे.
अवघ्या १६ प्रशासकांवरच भार
तब्बल ५७ ग्रामपंचायतींची मुदत संपली असली तरी या सर्व ग्रामपंचायतींचा भार केवळ १६ अधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आला आहे. काही प्रशासकांवर तब्बल चार ग्रामपंचायतींचा भार आहे. यापूर्वी देखील इतर ग्रामपंचायतींवर त्यांना कामकाज करावे लागत आहे.