मनोज शेलार
लाेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या वर्षभरात शहादा व पुढच्या वर्षी नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिकांच्या निवडणुका लक्षात घेता पालिकांमध्ये सत्ताधारी व विरोधकांकडून बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नुकत्याच नंदुरबार पालिकेत झालेल्या उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवक निवडीत हे दिसून आले. येत्या आठवड्यात विषय सभापती निवड होणार असून त्यातही हा फार्म्यला कायम राहणार आहे. तळोदा व नवापूर पालिकेत देखील तेच घडणार आहे. दुसरीकडे १० महिने शिल्लक असलेल्या शहादा पालिकेत राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण शांत राहते. कारण दोन महिने कुठल्याही सार्वजनीक निवडणुका नसतात. त्यातील एक वर्ष निघून गेले आहे. आता दुसरे वर्ष लागले असून येत्या दहा महिन्यानंतर शहादा पालिकेची निवडणूक लागणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी अर्थात २०२२ मध्ये नंदुरबार, तळोदा व नवापूर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने आतापासूनच राजकीय पक्षांनी आपल्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. त्याची चुणूक विविध पदांवरील नियुक्तींवरून दिसून येत आहे. नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्ष व चार स्विकृत सदस्यांची निवड गेल्या आठवड्यात झाली. सत्ताधारी गटाचे तीन आणि विरोधी गटाचा एक असे चार सदस्य स्विकृत नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे होते. त्यातील सत्ताधारी गटाचे दोन सदस्य निवडून आले. परंतु एक सदस्याच्याच निवडीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कागदपत्रांचा आक्षेप घेतल्याने ती निवड रद्द करण्यात आली ती लवकरच होणार आहे. विरोधी गटातून एका सदस्याची निवड झाली. उपनगराध्यक्ष निवडतांना देखील पुढील आवश्यक बाबींचा विचार करण्यात आला. पुढील वर्षी अर्थात डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या स्विकृती नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडतांना जात, समाज आणि मतबॅंक यांचा विचार केला जाणार आहे. नंदुरबार पालिकेत आता विषय समिती सभापतींच्या निवडीच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व नगरसेवकांना सामावून घेण्याच्या भुमिकेअंतर्गत यावेळी सर्व विषय समिती सभापती बदलले जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने सत्ताधारी गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काही नावे निश्चित देखील केली असल्याचे समजते. तळोदा पालिकेत स्विकृत नगरसेवक निवडीच्या हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत. अनेकांनी त्यासाठी फिल्डींग लावली आहे. या पालिकेतील राजकारण देखील वेगळ्या वळणावर आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी व विरोधकांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला वेग दिला आहे. नवापूर पालिकेतही यापेक्षा वेगळे चित्र नाही.शहादा पालिकेत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप, कॅांग्रेस आणि शिवसेना यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी देखील या ठिकाणी जोरावर आहे. येथील नगराध्यक्ष भाजपचे आहेत. त्यांचे पूत्र कॅांग्रेसचे आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांच्या भुमिकेला महत्त्व राहणार आहे. पूर्वी कॅांग्रेसमध्ये असलेले व आता भाजपत आलेले दीपक पाटील, त्यांचे बंधू मकरंद पाटील हे भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत. शिवसेनेची भुमिका या ठिकाणी निर्णायक राहणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मानणारा गट येथे सक्रीय असेल. राष्ट्रवादीने देखील आपली ताकद शहाद्यात लावण्यास सुरुवात केली आहे. एकूणच सरते वर्ष व येती दहा महिने विना निवडणुकीची आहेत. परंतु नंतरची दोन्ही वर्ष हे निवडणुकीमय राहणार आहेत. त्यात चारही पालिकाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्या माध्यमातून आतापासूनच पालिकांमध्ये विविध निवड, नियुक्त्या आणि रुसवे-फुगवे यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना टिकविण्यासाठी देखील नेत्यांची कसरत राहणार आहे.