तळोदा : येथील नगरपालिकेची सभा शुक्रवारी घेण्यात आली. या वेळी विषयपत्रिकेतील ट्रॅक्टर, ड्रायव्हर भाड्याने लावणे व वारस-वशिला हक्काने सफाई कामगार नियुक्त करणे, या दोन विषयांवर हरकत घेत नगरसेविकेने पतीसह पालिका दालनात ठिय्या मांडला होता. शेवटी, या विषयी प्रशासनाने लेखी खुलासा करत शंका दूर केल्याने त्यांनी ठिय्या मागे घेतला होता.
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नगराध्यक्ष अजय परदेशी यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, मुख्याधिकारी सपना वसावा हे उपस्थित होते. या सभेमध्ये तळोदा शहराच्या विविध विकासाच्या दृष्टीने १४ विषय घेण्यात आले होते. सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. परंतु, शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांनी विषयपत्रिकेवरील ट्रॅक्टर, ड्रायव्हर भाड्याने घेणे व सफाई करणाऱ्यांची वारसा हक्काने पदस्थापना करणे, या विषयांना हरकत घेत विरोध केला होता. याबाबत पालिका प्रशासनाच्या निदर्शनास का आणून दिले नाही, असा सवाल उपस्थित करून कचरा संकलनाचा ठेका ९ सप्टेंबर रोजीच देण्यात आला आहे. तरीही, हा विषय का घेण्यात आला, त्यामुळे त्यांनी पालिका सभागृहाबाहेर ठिय्या मांडला होता. शेवटी, मुख्याधिकारी सपना वसावा यांनी लेखी खुलासा केल्यानंतर ठिय्या मागे घेतला.
सर्वसाधारण सभेत पालिका हद्दीतील सर्व मालमत्ताकर पात्र मूल्यांकन सुधारणा, अनुषंगिक खर्च कमी करणे, को-ऑर्डिनेटर पदांना मुदतवाढ, गटारातील गाळ, कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने लावणे, आरोग्य विभागातील सर्व वाहनांचा विमा उतरवणे, घंटागाडी दुरुस्ती, एकाकी पदांची कुंठितता घालविणे, श्रीरामनगर, सूर्यवंशीनगर, सुशीला पार्वतीनगर, दामोदरनगर, विद्यानगरी, नेमसुशीलनगर, सीताईनगर, विष्णुलतानगर, भिकाजीनगर, श्रीजी पार्क याठिकाणी मोकळ्या जागेत झाडे लावणे, तारेचे कुंपण करणे, वृक्षसंवर्धन करणे, नवीन वसाहतीतील कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकणे, थ्री फेज जोडणी करणे, शासकीय परिपत्रकानुसार वारसा हक्काने सफाई कामगार नियुक्ती आदींसह एकूण १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेला नगरसेवक सुभाष चौधरी, संजय माळी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी, प्रतीक्षा ठाकूर, शोभाबाई भोई, सुनयना उदासी, सविता पाडवी, बेबीबाई पाडवी, अंबिका शेंडे, कल्पना पाडवी, सुरेश पाडवी, अमनुद्दीन शेख, रामानंद ठाकरे, हेमलाल मगरे, योगेश पाडवी यांच्यासह सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. सभा यशस्वितेसाठी कार्यालयीन प्रशासकीय प्रमुख राजेंद्र माळी, दीपक पाटील, नितीन शिरसाठ, आश्विन परदेशी, सुनील सूर्यवंशी, युगश्री पाडवी, लेखापाल विशाल माळी, विनीत काबरा, एम.एस. गावित, दिगंबर माळी, नारायण चौधरी, मोहन सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले होते.
फॉगिंग मशीन खरेदी
तळोदा नगरपालिकेने शहर स्वच्छतेचा ठेका नाशिक येथील कंपनीला दिला आहे. पालिकेने त्यांना फॉगिंग मशीन आणायला सांगितले असून, त्या मशीनने सर्व तळोदा शहरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत ते मशीन दाखल होईल, अशी माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी व उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी दिली आहे. या मशीनमुळे शहरात वाढलेल्या डासांच्या साम्राज्याचा नायनाट होणार असल्यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. ही खूशखबर कर्मचाऱ्यांना दिली, त्याबद्दल नगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा सत्कार केला.