मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : पालिकेच्या ८० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शहरातील मुख्य डीपी रोड या अंतर्गत करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव तत्कालीन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी नगरविकास विभागाकडे पाठविला होता.
नंदुरबार पालिकेचा विस्तार वाढत आहे. नवीन वसाहतींमध्ये मुख्य रस्ते व डीपी रस्ते तयार करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. परंतु त्यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. यासाठी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत डीपी रोडचा प्रकल्प शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. राज्यस्तरीय कमिटीने या प्रकल्पास मान्यता दिली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता. ९९ कोटी रुपये खर्चाचा रस्ते प्रकल्प तीन रस्ते वगळून अर्थात ८० कोटींचा रस्ते प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रकल्पास मान्यता दिल्याने तत्कालीन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे व तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.