लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बिलाडी रस्त्यावरील इदगाह मैदानाच्या परिसर सद्या दररोज गोळीबाराचा आवाज दणाणत आहे. दररोज या ठिकाणी शेकडो राऊंड फायर होत आहेत. निरव शांततेच्या वातावरणात गोळीबाराचा आवाजाने पशुपक्षी देखील या भागात येत नसल्याचे चित्र आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा गोळीबार सराव इदगाह मैदानावर सुरू करण्यात आला असून जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांना सरावात सहभागी करून घेण्यात येणार आहे. दरम्यान, सरावाच्या भागात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.नंदुरबार पोलिस दलातर्फे नियमित गोळीबार सराव शहरातील इदगाह मैदानाच्या टेकडी परिसरात सुरू करण्यात आला आहे. या भागात सराव सुरू असतांना कुणालाही येण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जवळपास दीड हजार पोलीस कर्मचाऱ्यांना गोळीबाराचा सराव करता येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्यास २० राऊंड फायर करण्याची संधी दिली जाते. त्यासाठी अधिकाऱ्यांकडून आवश्यक ते मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. सर्व राऊंडची माहिती संकलीत केली जाते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक किशोर नवले, पोलीस निरिक्षक डी.के.राजपूत, पीटी मास्तर राजेंद्र साळुंखे यांच्या उपस्थितीत कर्मचारी सराव करीत आहेत.
दोन दिवसांपासून सराव पोलीसांचा गोळीबार सराव हा ८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी जबाबदार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सराव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा या ठिकाणी पोलीस दलाने उपलब्ध करून दिल्या आहेत.