लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ासह सपाटीच्या भागातील रानावनात उगवणा:या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी शहरातील खवय्यांना उपलब्ध झाली़ छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहाच्या डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवाला शेकडोंच्या संख्येने खवय्यांनी हजेरी देत विविध भाज्यांची चव चाखली़ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार, बायफ, महिला आर्थिक विकास मंडळ, योजक पुणे, कृषी विज्ञान केंद्र कोळदे आणि रीड्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा खाद्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषीतज्ञ गजानन डांगे होत़े प्रमुख अतिथी म्हणून स्त्री शक्तीच्या श्रीमती बेदी, सहायक प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, जात पडताळणीचे सहसंचालक दिनेश तिडके, कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे, शुभांगी सपकाळ उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांसह मौखिक ज्ञान परंपरा सांभाळणा:या ज्योतीबाई वसंत पावरा, नोवी सुनील पाडवी, बाधाबाई अशोक कोकणी, शकुंतलाबाई देविदास रावताळे या महिला प्रतिनिधींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल़े महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नावली ता़ नवापुर येथील शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केल़े डॉ़डांगे यांनी आदिवासी व ग्रामीण समाजाकडे अत्यंत समृद्ध अशी ज्ञान परंपरा आह़े या ज्ञानाचे लेखन करणे व हा वारसा जपून ठेवणे हे राष्ट्रीय कर्तव्य आह़े पुढील पिढीसाठी हे लेखन दीर्घकाळ उपयुक्त ठरेल असे सांगितल़े प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी देसाई यांनी तर सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ आर.पी. देशमुख यांनी केले.
अक्कलकुवा, धडगाव, शहादा, नवापुर येथील महिलांनी महोत्सवात सहभाग घेतला होता़ 150 पेक्षा अधिक सहभागी महिलांनी 70 स्टॉल्सद्वारे 42 विविध रानभाज्यांची मांडणी केली होती़ घरुन तयार करुन आणलेल्या भाज्यांसोबत नाचणी, ज्वारी, दादर, मका यांच्या भाकरीही महिलांनी तयार करुन आणल्या होत्या़ या भाज्यांची चव घेत मान्यवरांनी परीक्षण करुन माहिती जाणून घेतली़ औषधी गुणधर्म असलेल्या भाज्यांची माहिती महिलांकडून देण्यात आली़