मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानीत आश्रमशाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी त्यातील विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदीच अत्यल्प राहत आहे. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या दैनंदिन वापराच्या विविध वस्तू खरेदीसाठीची डीबीटी प्रक्रिया देखील अद्याप राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात आणि घरून आणलेल्या साहित्यावरच वेळ निभावून न्यावी लागत असल्याचे चित्र आहे. आदिवासी विकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या शासकीय व खाजगी अनुदानीत आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या आवश्यक व गरजेच्या वस्तू खरेदीसाठी त्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा केली जाते. त्यात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना वार्षीक आठ हजार ५०० रुपये तर दहावी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नऊ हजार ५०० रुपये वर्षाला दिले जातात. या माध्यमातून विद्यार्थ्यानी स्वच्छता साधने, शालेय वस्तू, दैनंदिन वापराच्या वस्तू, गणवेश, नाईट ड्रेस यासह इतर वस्तू खरेदी करावयाच्या असतात. गेल्या दोन वर्षात ही योजना राबविली गेली आहे. अर्थात शाळा सुरू होताच डीबीटीची ही रक्कम अदा केली जात असते. यंदा कोरोनामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. गेल्या आठवड्यापासून नववी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यातील विद्यार्थी संख्या देखील अगदीच नगण्य स्वरूपातील अर्थात एकुण विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच ते सात टक्केच इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयातील एकुण शासकीय व खाजगी अनुदानीत अशा १३९ आश्रम शाळा आहेत. ७४ शासकीय तर ६५ अनुदानीत आश्रम शाळांचा समावेश आहे. याशिवाय ४७ वसतिगृहे आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता एकुण साडेआठ हजार विद्यार्थी आहेत. यातील जवळपास ७५ टक्के विद्यार्थ्यांशी त्या त्या शाळांचा संपर्क झालेला आहे. एकुण ५० टक्केपेक्षा अधीक विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. आश्रम शाळा उघडून दुसरा आठवडा उजाडला आहे. तरीही विद्यार्थी संख्या १० टक्केच्या वर पोहचू शकलेली नाही. आश्रम शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना सद्या तरी जुन्याच गणवेशावर अवलंबून राहावे लागणार आहे. शालेय साहित्य देखील जुनेच आहे. पुस्तके यापूर्वी वाटप झालेली आहेत. परंतु दैनंदिन गरजेच्या वस्तू घरूनच आणाव्या लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत आहार दिला जातो. सेंट्रल किचन अंतर्गत येणाऱ्या २३ शाळांना सेंट्रल किचनतर्फे आवश्यक सिधा पोहचविण्यात आला आहे. तर इतर शाळांना आपल्या स्तरावरच सिधा खरेदीसाठीची परवाणगी देण्यात आलेली आहे. सद्या तरी विद्यार्थी संख्या नगण्य असल्याने आहाराचा फारसा ताण आश्रम शाळांवर पडत नसल्याची स्थिती आहे. परंतु विद्यार्थी संख्या वाढल्यावर हा ताण वाढणार असल्याचे स्पष्ट आहे. आश्रम शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले असले तरी त्यात केवळ तीन विषयांचेच अध्यापन करण्यात येत आहे. त्यात इंग्रजी, विज्ञान व गणिताचा समावेश आहे. इतर विषयांचे अध्यापन पुर्वीप्रमाणेच राहणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पालक सभा, शालेय शिक्षण समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत.
डीबीटीची रक्कम लवकर मिळावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे अकाऊंट डिटेल्स व इतर माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आलेली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती वाढावी यासाठी सर्वच माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे. -वसुमना पंत, सहा.जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, नंदुरबार.