रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महाजनादेश यात्रेने आणि या यात्रेनिमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी केलेला पक्षात प्रवेश भाजपसाठी संघटनात्मकदृष्टय़ा मजबूत करणारे ठरले आहे. तथापि, त्यामुळे आगामी निवडणुकीत इच्छुकांची संख्याही वाढली असल्याने त्यांची मनधरणी करणे भाजपसाठी आव्हानच ठरणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा गुरुवारी रात्री नंदुरबारात आली होती. रात्रीची सभा असली तरी या सभेला जिल्हाभरातून कार्यकत्र्याची झालेली गर्दी पक्षासाठी आशादायी चित्र निर्माण करणारी होती. याच सभेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, अक्राणी मतदारसंघातील गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे विजय पराडके, जि.प. सदस्य किरसिंग वसावे, आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यानी भाजपत प्रवेश केला.तसे या प्रवेशानंतरचे राजकारण पाहता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यापूर्वीदेखील डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांचा प्रवेश भाजपच्या राजकारणात फार काही बदल घडवणारा नाही. पण काँग्रेसचे कार्यकर्ते भरत गावीत व दीपक पाटील यांच्यामुळे निश्चितच भाजपला संघटनात्मक दृष्टीने फायदा होणारा आहे. हा फायदा आगामी निवडणुकीत पक्ष कशा पद्धतीने करून घेतो तो येणारा काळ ठरवेल.सद्यस्थितीत जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून त्यात नंदुरबार व शहादा-तळोदा या दोन जागा भाजपकडे आहेत तर नवापूर आणि अक्राणी या दोन जागा काँग्रेसकडे आहेत. पक्ष प्रवेशात नवापूर आणि अक्राणीच्या कार्यकत्र्याची संख्या जास्त आहे. त्यापैकी भरत गावीत यांच्या रुपाने भाजपला नवापूरमध्ये सक्षम उमेदवार मिळणार आहे. तर अक्राणीमध्ये मात्र आधीच इच्छुकांची संख्या जास्त आहे. तेथे भाजपकडून नागेश पाडवी, डॉ.नरेंद्र पाडवी हे इच्छुक आहेत. त्यात पुन्हा विजय पराडके व किरसिंग वसावे या दोघांची भर झाली आहे. तळोदा-शहाद्यातही उदेसिंग पाडवी विद्यमान आमदार आहेत. तेच स्वत: उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना भाजपने प्रवेश दिल्याने तेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवाय तेथील तालुका अध्यक्ष रुपसिंग पाडवी हेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळे अक्राणी आणि तळोदा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाला कसरत करावी लागणार आहे.रामचंद्र पाटील व राष्ट्रवादीचे शहादा तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील या दोघांच्या प्रवेशामुळे नंदुरबार विधानसभेत पक्षाला लाभ होणार आहे. त्यापैकी ईश्वर पाटील हे यापूर्वीच डॉ.विजयकुमार गावीत यांचे समर्थक होते. पण रामचंद्र पाटील यांच्यामुळे प्रकाशा व परिसरातील काँग्रेसकडे असलेले कार्यकर्ते भाजपसाठी फायद्याचे ठरणार आहेत.एकीकडे हे चित्र असले तरी नवीन पक्षात आलेल्या कार्यकत्र्यामुळे आधीच भाजपमध्ये असलेल्या गटातटात वाढ होणार आहे. विशेषत: शहादा तालुक्यात तीन वेगवेगळ्या दिशेतील गट आता एकत्र भाजपमध्ये राहतील तर अक्राणी-अक्कलकुवा तालुक्यातही असेच चित्र आहे. हे गट-तट मिटविणे भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष चौधरी यांचे जाहीरपणे कौतुक केल्याने त्यांना त्यांच्या कौतुकास पात्र ठरण्यासाठी कसोटीला उतरावे लागणार आहे.
इच्छुकांची मनधरणी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:00 PM