नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी बामखेडा गावाला भेट देत ग्रामस्थांना शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात सक्रिय सहभागी होण्यासंबंधी प्रेरित केले होते. त्यानंतर पर्यावरण व निसर्गाच्या संरक्षणासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे ग्रामस्थांना पटवून देण्यासाठी बामखेडा ग्रामपंचायतच्या वतीने स्थानिक भाषेत जनजागृती करण्यात आली.
यावेळी जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी आणि बामखेडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील स्वच्छता, वृक्षारोपण, जल व मृदासंवर्धन, अशा विविध पर्यावरणपूरक विषयावर स्थानिक भाषेत जनजागृती केली. गावातील चौकाचौकांत अहिराणी भाषेत नाटिका सादर करून जय मल्हार जागरण गोंधळ पार्टीने लोकांना पर्यावरणाचे वाढते प्रदूषण आणि त्याची विविध कारणे लक्षात आणून दिलीत, तसेच पर्यावरण आणि पंचमहाभूते वाचवण्यासाठी आपण सहज प्रयत्न करू शकतो, अशा उपाययोजना सुचवल्या.
याप्रसंगी सरपंच मनोज चौधरी व ग्रामसेवक मनीष रामोळे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आदींनी माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
फोटो :
बामखेडा, ता. शहादा येथे माझी वसुंधरा योजनेविषयी जनजागृती करताना जय मल्हार गोंधळ पार्टीचे कलाकार.