भारताच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने नंदुरबार तालुक्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसई फाउंडेशन, जिल्हा परिषद आणि नंदुरबार पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सैताने येथे उघड्यावरील हागणदारी मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात समुदाय संचलित संपूर्ण ट्रिगर विधी अंतर्गत रात्र सभा, सीएलटीएसद्वारे लोकांना जनजागृती करण्यात आली. हागणदारी मुक्तीसाठी निगराणी समिती स्थापन करण्यात येऊन महिला सभा, रात्र सभामध्ये ग्रामस्थांना हागणदारी मुक्तीचे फायदे आणि तोटे यावर मार्गदर्शन करण्यात आले. यात पुरुषांना व महिलांना शौचालय वापराकरिता प्रेरित करण्यात आले.
गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचाला जाणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे वर्तणूक बदलासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तीन दिवस घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत संस्थेच्या व्यवस्थापक आकांक्षा बोरकर, मंगेश निकम, अभिजित मैंदाड, नितीन महानुभव, निशांक गजभिये, संतोष नगारे, अनिल पवार, विजय गावीत, राकेश गुरव, वैभव खांडवी, सुनीता भोये, मारोती चिमनकर, किशोरी शेवाळे, नीलेश पगारे, दारासिंग पावरा, आदींनी मार्गदर्शन केले.