उत्पादनवाढीने भाजीपाला स्वस्त
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागांत यंदा पाणकोबी व शिमला मिरचीचे उत्पन्न चांगले आहे. हा माल शेतकरी बाजारपेठेऐवजी थेट रस्त्यावर जाऊन विकत आहेत. यातून नंदुरबार ते प्रकाशा, नंदुरबार ते रनाळे, विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर भाजीपाला विक्री करणारे शेतकरी दिसून येत आहेत. यातून बाजारपेठेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश शेतकरी विक्री करत आहेत.
अवैधरीत्या मुरूम काढण्याचे प्रकार सुरू
नंदुरबार : शहरातील वाघेश्वरी टेकडी परिसरात पुन्हा अवैधरीत्या मुरूम काढण्याचे काम सुरू आहे. महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील वाघेश्वरी टेकडीच्या मागील बाजूस अर्थात कृषी महाविद्यालयाच्या कंपाउंडला लागून अवैधरीत्या मुरूम काढण्याचे काम सुरू आहे. दररोज दोन ते तीन ट्रॅक्टर शेकडो ब्रास मुरूम काढून नेत आहेत. याबाबत महसूल विभागाकडे कुठलीही रॉयल्टी भरलेली नसल्याचे सांगण्यात आले. असे असतानाही तहसील कार्यालय व संबंधित तलाठींनी याकडे दुर्लक्ष केल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित होत आहे. याबाबत कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.