लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाप्पांचे स्वागत खड्डेयुक्त रस्त्यांवरून होणार की काय? अशी भाविकांना शंका असतांनाच नंदुरबार पालिकेने शनिवारपासून खड्डे बुजविण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू केली आहे. ‘लोकमत’ने 30 ऑगस्टच्या अंकात याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पावसाची संततधार आणि दोन ते तीन वेळा अतिवृष्टी यामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची वाट लागली आहे. गणपती विसजर्न मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या रस्त्यावर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत. याशिवाय इतरही मुख्य रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांना त्रासदायकच ठरले आहेत. त्यामुळे यंदा बाप्पांचे स्वागत खड्डेयुक्त रस्त्यांनी होणार की काय अशी शंका भाविकांमध्ये होती. याबाबत ‘लोकमत’ने देखील 30 ऑगस्टच्या अंकात याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालिकेने शनिवारपासून रस्ते दुरूस्तीच्या कामाला सुरुवात केली. दिनदयाल चौकापासून या कामाला सुरुवात झाली असून रविवार सायंकाळर्पयत मुख्य मिरवणूक मार्ग आणि इतर रस्त्यांवरील खड्डे बुजविले जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी रस्त्यांची अतिशय खराब अवस्था आहे अशा ठिकाणी पावसाळ्यानंतर नवीन रस्ते तयार करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. नंदुरबार पालिकेप्रमाणेच शहादा, तळोदा व नवापूर पालिकेने देखील याबाबत तातडीने निर्णय घेवून मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवावे अशी अपेक्षा त्या त्या शहरातील भाविकांमधून व्यक्त होत आहे.
गणशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर अखेर खड्डे बुजविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:55 AM