लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील सारंगखेडा येथील श्री दत्त प्रभूंची यात्रा घोडे बाजारासाठी भारतभर प्रसिद्ध आहे. घोडे बाजाराबरोबर ही यात्रा बैलबाजार व शेतीउपयोगी अवजारासाठीही परिसरात प्रसिद्ध होती. मात्र यांत्रिकीकरणामुळे शेती व्यवसायात बैलांचा उपयोग कमी झाल्याने यात्रेतील बैलबाजार घोडेबाजाराच्या तुलनेत खूप मागे पडल्याचे चित्र आहे.शहादा तालुका हा कृषीसंपन्न तालुका आहे. तालुक्यात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने बैलजोडी, बैलगाडी, वखर-नागर यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसायही तेजीत होता. सांगरखेडा येथील दत्त प्रभूंची यात्रा घोडेबाजारासाठी भारतभर प्रसिध्द असली तरी या यात्रेत १६-१७ वर्षापूर्वी बैलबाजारही तेजीत होता. परिसरातील शेतकरी बैलजोडीसह शेती अवजारांची खरेदी वर्षातून एकदाच यात्रेत करीत असत. त्यामुळे यात्रेत घोडा बाजाराप्रमाणे स्वतंत्र बैलबाजारही भरत असे. यातून मोठी उलाढालही होत होती. त्याचबरोबर बैलांसाठी लागणारे गोंडे, नाथ, दोर, शेली, शिरदा आदी साहित्याचाही मोठा बाजार भरत असे. मात्र बैल बाजारात बैलांची आवक कमी झाल्याने या व्यावसायिकांनाही ग्राहकांची प्रतीक्षा आहे.बदलत्या काळानुसार शेती व्यवसायात मोठे बदल होत गेले. शेतात बैलांची जागा लहान ट्रॅक्टरसारख्या आधुनिक साधनांनी घेतल्याने बैल खरेदी व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे. बैलांचीच खरेदी होत नसल्याने बैलगाड्या व शेतीच्या इतर साहित्यांचे मार्केटही डाऊन झाले. ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्यात चार-पाच बैलजोड्या दिसत होत्या त्या जागेत आता ट्रॅक्टर व इतर वाहने दिसू लागली आहेत. त्यामुळे एकेकाळी यात्रेत बैलबाजारात असणारी रेलचेल आता कमी झाली आहे. २००२ साली यात्रेत १६८ बैलांची विक्री झाली होती तर गेल्यावर्षी २०१८ मध्ये एकाही बैलाची विक्री झाली नाही. याउलट २००२ साली ६१० घोड्यांची विक्री झाली होती. गेल्यावर्षी २०१८ मध्ये हा आकडा एक हजार ५१ पर्यंत पोहोचला. एकीकडे घोड्यांच्या विक्रीत कमालीची वाढ होत असतांना मात्र मागील तीन वर्षात यात्रेत एकाही बैलाची विक्री झाली नसल्याचे दिसते. बैलांच्या खरेदी-विक्रीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असल्याने यात्रेतील बैलबाजार आता नामशेष झालेला दिसत आहे.गेल्या १७ वर्षांत सारंगखेडा यात्रेत तब्बल १५ हजार ९९३ घोड्यांची विक्री झाली आहे तर याच कालावधीत फक्त १ हजार ४४७ बैलांची खरेदी - विक्री झाल्याने भविष्यात सारंगखेडा यात्रेत सर्जा राजा दिसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सारंगखेडा यात्रेतून बैलबाजार नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:30 PM