लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नशिबी आलेल्या दारिद्र्यात ऊसतोड कामगारांना पोटासाठी काबाडकष्ट करावे लागते. त्यांना ऊस ट्रक व ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी लाकडी सीडीवरून जीवघेण्या कसरती देखील कराव्या लागत आहे. या मजुरांच्या हे विदारक क्षण कुठल्याही व्यक्तीला भावनिक वेदना देणारे ठरतात. डोक्यावर मोळी घेत सीडीवर तोल धरुन जाण्याचा हा प्रसंग त्यांच्या जीवनातील गरीबीचा समतोल साधणारा ठरत आहे.बेताच्या परिस्थितीत जीवन जगणारे चाळीसभाव, कन्नड, मालेगाव, साकी व धडगाव या भागातून ऊसतोड कामगार नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर या साखर कारखान्याच्या क्षेत्रात दाखल झाले आहेत. मुळगावापासून मैलो दुर असलेल्या या ठिंकाणी ऊसतोडणीचे काम करताना या कामगारांना अनेक वेदना सहन कराव्या लागत आहे. काही ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातूनही आल्याचे दिसूनयेत आहे. साखर कारखाने सुरू असल्याने सर्व मजूर तेथेच ऊस तोडत तेथेच वास्तव्याला आहे. नंदुरबार तालुक्यात दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांमध्ये केवळ पुरुषच नसून महिला देखी समावेश आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही ऊसतोडणीचे काम करीत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडावर काबाडकष्ट करावे लागते. कारखाना चालू असेपर्यंत मजुरांना हे काम करावे लागते. त्यांना काम करताना दिवस व रात्रीचेही भान राहत नाही.पोटाची आग शमविण्यासाठी हे कामगार साप, विंचवांचेही भय ते बाळगीत नाही. मुकादमाकडून घेतलेली उचल न फिटल्यास मुकादमास व्याजासह ती रक्कम परत करावी लागते. या भीतीने घेतलेली उचल फेडणे हाच ध्यास मजुरांपुढे असतो. अशावेळी त्यांना वेळेवर जेवण तर सोडाच दोन वेळचे ताजे अन्नही मिळत नाही. अनेक वेळा शिळ्या अन्नावरच अवलंबून राहावे लागते. ऊसाच्या शेतात ऊस तोडताना उसाच्या बुडक्या व कोयते लागून अनेक कामगार जखमी होतात. थंडीच्या दिवसात त्या चिघळतातही. परंतु जखमेची काळजी घेण्यास वेळ पुरत नसल्याने ते त्याकडे फारसे लक्ष देत नाही. ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे. मोळ्या बांधलेला ऊस फडाबाहेर काढण्यासाठी डोक्यावर वाहतूक करावी लागते. वाहतूक केलेला ऊस ट्रक-ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी उसाची मोळी डोक्यावर घेऊन लाकडी शीडीवर चढावे लागते. लाकडी सीडीवर चढताना मजुरांना जीवघेण्या कसरती कराव्या लागतात. अशा वेळी तोल गेल्यास खाली पडून मजुरांना आपला जीवही गमवावा लागतो.
मुळात ऊसतोडीचे काम हे अंगावर काटे आणणारे ठरते. ऊसतोडीसाठी प्रामुख्याने कोयताचा वापर केला जात असतो. झटपट काम होऊन अपेक्षेनुसार रोज मिळावा यासाठी प्रत्येक मजूराकडून धारदार कोयताच निवडला जातो. ऊसतोडणीच्या कामात धावपळ करीत असताना अंगावर अनावश्यकपणे कोयता लागत असतो. शिवाय अंगाला स्पर्श होणारा ऊसाचा पाचटमुळे अंगाची लाही-लाही देखील होते. तर बहुतांश कामगारांना ऊसाच्या कापलेल्या खोडामुळेही जखमा होतात. परंतु हे कामगार असा जखमांचा फारसा विचार न करता केवळ पोटा-पाण्याचाच विचार करतात.