एकूण ११ सदस्यपदाच्या जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायत ताब्यात घेण्याच्या उद्देशाने जय किसान पॅनेल व ग्रामविकास पॅनेल या निवडणुकीत एकमेकांसमोर आहेत. दोन्ही पॅनेलप्रमुखांनी विजयाचा निर्धार करीत प्रचाराला सुरुवात केली आहे. यातंर्गत गावामध्ये शक्तिप्रदर्शन सुरू आहे. गावात जय विकास पॅनेलचे पॅनेलप्रमुख तथा विद्यमान सदस्य शिवदास चौधरी आणि ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख मनोज चाैधरी यांच्यात प्रभाग दोनमध्ये तुल्यबळ लढत सुरू आहे. मनोज चाैधरी हे विद्यमान सरपंच लीना चौधरी यांचे पती आहेत. या प्रभागात शिवदास चौधरी हे २० वर्षांपासून निवडून येत आहेत. असे असतानाही मनोज चौधरी यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी करून चुरस निर्माण केली आहे. प्रभाग क्रमांक २, ३ आणि ४ मध्ये चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. दोन्ही पॅनेल हे भाजप व काँग्रेस या पक्षांसोबत नातं सांगणारे असल्याने या ग्रामपंचायतीकडे पक्षीय राजकारणातूनही पाहिले जात आहे. दरम्यान, बामखेडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून गावातील सुज्ञ, शिक्षित, ज्येष्ठ नागरिक यांनी प्रयत्न केला होता. परंतु, काही जागांवर एकमत न झाल्याने शेवटी दोन्ही पॅनेलप्रमुखांनी पॅनेल लढविण्याचा निर्णय घेतला. एकीकडे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत असताना दुसरीकडे सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर निघणार असल्याने पॅनेलप्रमुखांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पॅनेलप्रमुख उमेदवार व कार्यकर्ते यांच्यावर पैसे खर्च करीत असले तरी निवडणूक नंतर जर आरक्षण वेगळ्या प्रकारे निघाले तर सरपंच पदाचे स्वप्न भंग पावू शकते, अशी एक चिंता लागून आहे. त्यामुळे सध्या तरी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.
प्रभाग व उमेदवार..
प्रभाग क्रमांक १ मध्ये जय किसान पॅनेलकडून यशवंत भिल, कंचनबाई भिल, मीराबाई भिल, ग्रामविकास पॅनेलकडून उखा भील, प्रमिलाबाई भील, राजसबाई भील, प्रभाग दोनमध्ये जय किसान पॅनेलकडून शिवदास चाैधरी, कल्पनाबाई चाैधरी, रमेश गवळे, ग्रामविकास पॅनेलकडून मनोज चाैधरी, अनिताबाई सोनवणे, जगन कापुरे, प्रभाग तीनमध्ये जय किसानचे अमोल पटेल, दुर्गाबाई चाैधरी, राजू भिल, ग्रामविकासचे योगेश पाटील, लीना चाैधरी, उखड्या भिल, प्रभाग चारमध्ये जय किसानच्या रेखाबाई भिल, सुरेखाबाई सोनवणे, ग्रामविकासच्या रेखाबाई भिल, शोभाबाई सोनवणे, आदी २२ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी गावात सध्या जोरदार प्रचार सुरू आहे.