नंदुरबार : अक्कलकुवा येथील बॅटरी-इन्व्हर्टरच्या गोडावूनमधून चोरट्यांनी एक लाख ४६ हजार रुपयांच्या ५८ बॅटरी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा येथील मुख्य रस्त्यालगत सीतानगरमध्ये मकसूदखान अब्दुल रहिमखान पठाण यांचे जया ऑटो इलिक्ट्रिक वर्क नावाचे दुकान व त्याला लागून गोडावून आहे. त्यात त्यांनी इन्व्हर्टरसाठी व वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी ठेवलेल्या असतात. चोरट्यांनी या गोडावूनच्या पत्र्यांचे नटबोल्ट काढून चोरट्याने पत्रा बाजूला करीत गोडावूनमध्ये प्रवेश केला.
आतील जुन्या व नव्या अशा तब्बल ५८ बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्या. त्यांची किंमत एक लाख ४५ हजार ९०० रूपये इतकी आहे. सकाळी मकसूदखान पठाण हे गोडावूनवर गेले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. अक्कलकुवा पोलिसांनी पंचनामा करून चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला. तपास पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहे. दरम्यान, मुख्य व नेहमीच रहदारीच्या असणाऱ्या रस्त्यावरील गोडावूनमधून एवढ्या मोठ्या संख्येने बॅटरी लंपास झाल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.