लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी समाज हा मुळातच धार्मिक प्रवृत्तीचा आहे. समाजात आजही अनिष्ट रूढी, परंपरा असून त्यांना नष्ट करण्याची गरज आहे. मानवाचे कल्याण व समाजाचा विकास करायचा असेल तर आधी व्यसनमुक्त व्हा, असे आवाहन संत महात्म्यांनी केले. सोमवारी पहाटे चार वाजता यज्ञ महोत्सवाचा समारोप करण्यात आला.नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे भातिजी संप्रदायाच्या वतीने रविवारी नवकुळ नाग पूजा नाम यज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून आलेल्या विविध संतांनी भाविकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर खासदार डॉ हीना गावीत, अजबसिंग महाराज, शामसिंग महाराज, दिलीप महाराज, रतिलाल महाराज, जयसिंग महाराज, जंबूभाई महाराज, सेवादास महाराज, खुमानसिंग महाराज, कुवरसिंग महाराज, आत्माराम महाराज, नारसिंग महाराज, सोमाभाई महाराज, रुमशीभाई महाराज, शिवाजी महाराज, अनितामाता, सरपंच वासंतीबाई वळवी आदी उपस्थित होते.या वेळी खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असल्याने येथील भूमी पवित्र झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला भक्तीच्या माध्यमातून दिशा मिळते. भातिजी महाराज संप्रदाय आदिवासी समाजासाठी व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. व्यसनमुक्त ही काळाची गरज असून व्यसनामुळे आरोग्यासह सामाजिक जीवनही धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप वसावे महाराज म्हणाले की, भातिजी महाराज संप्रदाय समाजातील अंधश्रद्धा, जुन्या रुढी-परंपरा व व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. सुसंस्कृत समाजासाठी सर्वानी एकत्र येणे आता गरजेचे झालेले आहे. पशू हत्या, मांसाहार, व्यसनाधीनता यांच्यापासून मानवाने दूर राहायला हवे. शरीर पवित्र होण्यासाठी मन पवित्र होणे गरजेचे आहे. भागवताचार्य जिज्ञासादीदी म्हणाल्या की, युवकांनी भक्तीच्या मार्गाकडे वळावे. भक्तीतच सर्वात मोठी शक्ती सामावल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आदिवासी, गुजराती, हिंदी व मराठी भाषेत अनेक उदाहरणे देऊन व्यसनमुक्तीचा संदेश दिला.कार्यक्रमात गुजरातमधील डेडीयापाडा येथील भजनी मंडळाच्या पथकाने सुमधूर भक्तीगीतांचे सादरीकरण केले. मध्यरात्री भातिजी महाराजांची सामूहिक आरती करण्यात आली. रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे चार वाजता भातिजी महाराजांचा जयघोष करून यज्ञ महोत्सवाची सांगता करण्यात आली.
समाजाचा विकास व कल्याणासाठी व्यसनमुक्त व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:30 PM