तळोदा : जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाने हल्ला चढवत तिचे पोटाचे लचके तोडले. यात महिला गंभीर जखमी झाल्यामुळे जागेवरच तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तालुक्यातील इच्छागव्हाणच्या गोंडापाडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा मोठा वावर वाढल्यामुळे वनविभागाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.पोलीस सूत्रानुसार तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण जवळील गोैडाटेंभापाडा येथील जानुबाई सत्या तडवी (65) ही महिला रोज आपल्या मालकीच्या शेळ्या जवळच्या डोंगरावरील जंगलात चारायला नेत असते. नेहमी प्रमाणे तिने शुक्रवारी नऊ वाजेच्या सुमारास जंगलात चारायला नेल्या होत्या. ती शेळ्यांच्या मागे उभे असतांना दबा धरून बसलेल्या अस्वलाने तिच्या मागून थेट हल्ला चढविला. महिलेने अस्वलाचा प्रतिकारदेखील केला. मात्र भरभक्कम असलेल्या अस्वलाने तिच्या पोटाचे, पायाचे लचके घेत पोटच झाडले होते. यात अतिरक्त श्राव झाल्यामुळे ती जागीच गत प्राण झाली. तत्पूर्वी तिच्या आरडाओरडामुळे आजू-बाजूचे मजूर तेथे धावून आले. त्यांनी अस्वलावर दगडफेक केल्यानंतर अस्वलाला तेथून पळवून लावले. त्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते. मयत महिलेचे तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत महिलेचा मुलगा सायसिंग सत्या तडवी (वय 38) रा.इच्छागव्हाणचा गौंडापाडा याने पोलिसात खबर दिली. त्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान अक्कलकुवा विभागाचे वनक्षेत्रपाल सोनाली गिरी यांना माहिती मिळताच ते पथकासह दाखल झाले. आता पुढील आर्थिक मदतीसाठी कार्यवाही करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
इच्छागव्हाण येथे अस्वलाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:36 AM