नंदुरबार : जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच आहे. आता चोरट्यांनी रात्रीच्या वेळी उभ्या ट्रकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. सारंगखेडा शिवारात उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या सुपारी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत सारंगखेडा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, केरळहून गुजरातकडे सुपारी घेऊन जाणारा मालट्रक (क्रमांक केए १४ सी ४०४३) शुक्रवारी रात्री सारंगखेडा येथील शौर्य पेट्रोल पंपासमोर आला असता रात्र झाल्याने चालकाने त्या ठिकाणी ट्रक उभा केला होता. रात्रीच्या वेळी चालक-सहचालक झोपलेले असताना चोरट्यांनी मालट्रकमधील सुपारीचे पोते लंपास केले. ७० किलो वजनाच्या प्रत्येकी ४० गोण्या चोरून नेल्या. एका गोणीची किंमत पाच हजार रुपये आहे. ७१० किलोच्या एकूण दोन लाख रुपये किमतीच्या सुपारी चोरून नेल्याचे सकाळी स्पष्ट झाले. शोधाशोध केल्यानंतर उपयोग झाला नाही. त्यामुळे चालक अब्दुल मौलासाब साहवाली, रा. हिरेगंटनूर, ता. चित्रदुर्ग (कर्नाटक) यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार किरण वाऱ्हे करीत आहे.
उभ्या ट्रकमधून दोन लाखांची सुपारी नेली चोरून
By मनोज शेलार | Published: March 03, 2024 8:06 PM