नंदुरबार : येत्या काळात सण, उत्सव सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फेस्टिव्हल ऑफर्स सुरू होणार आहेत. त्यातून काही बनावट लिंक, वेबसाईट लोकांना फसवण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यामुळे फेस्टिव्हलच्या ऑफर्सच्या नावाखाली सावधान राहावे असे आवाहन सायबर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
फेस्टिव्हलच्या नावाखाली विविध वेबसाईटवर तसेच सोशल मीडियावर जाहिराती सुरू झाल्या आहेत. लिंकद्वारे किंवा अॅपद्वारे अशा ऑफर येऊ लागल्या आहेत. परंतु काही वेळा ते बनावट देखील असतात. त्यामुळे पैसे भरूनही वस्तू न येणे, मागविलेल्या वस्तूऐवजी दुसरी येणे, खराब वस्तू पाठविणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे अनेकांची हजारो ते लाखो रुपयांची फसवणूक होत असते.
सध्या फेसबूकवर विविध माध्यमातून अगदी सांसरीक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॅानिक वस्तूंच्या जाहिराती येतात. ऑनलाईन पेमेंटद्वारे पैसे भरून वस्तू १० ते ४० टक्के सूट देऊन घरपोच पोहचविण्याची ऑफर दिली जाते. त्याला भुलून अनेकजण ऑनलाईन पैसे भरतात. परंतु त्या वस्तूची, कंपनीची ती साईटच नसते. त्यामुळे भरलेले पैसे वाया जातात, नंतर संबंधितांकडून उत्तर मिळत नाही.
विविध नामांकित कंपन्याचा लोगो वापरून, नाव वापरून लिंक तयार केली जाते. ती लिंक व्हॅाट्सअॅप किंवा फेसबूकवर पाठविली जाते. फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सूट असल्याचे सांगितले जाते. परंतु संबधित लिंक बनावट असते. भरलेले पैसे तर वाया जातातच शिवाय वस्तूही मिळत नाही.
n कंपनीची अधिकृत वेबसाईटवरच वस्तूंची मागणी नोंदवा. ऑनलाईन पैसे भरतांना सर्व बाबींची पडताळणी करा. त्यासाठी आधी कमी रक्कम ऑनलाईन भरा ती यशस्वीरित्या वर्ग झाली तर पुढील रक्कम वर्ग करा. जेणेकरून मोठ्या रक्कमेची फसवणूक टळू शकते.
n कुठलीही कंपनी २० ते २५ टक्केपेक्षा अधिकच्या सूटची ऑफर देत नाही. त्यामुळे ३० ते ५० टक्के फेस्टिव्हल ऑफरला बळी पडू नका. सहसा अशा कंपन्या बनावट असतात.