लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील नवनीत लोहार यांच्या घरापासून ते कुंभारवाड्यापर्यंतचा रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. काँग्रेस व भाजपने एकाच रस्त्याचे उद्घाटन केल्याने या रस्त्याचे श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांत चढाओढ निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आमदार शिरीषकुमार नाईक व भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी एकमेकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. नवापूर नगर पालिकेकडून ५६ लाख रुपये खर्च करून हा रस्ता तयार केला जाणार आहे. सर्वांत आधी रस्त्याचा प्रारंभ भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष एजाज शेख, प्रदेश आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष अनिल वसावे, तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, चिटणीस हेमंत जाधव, नगरसेवक महेंद्र दुसाने, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे, नीलेश प्रजापत, जगदीश जयस्वाल, प्रशांत मोरे, अनिल दुसाने, हरिश्चंद्र पाटील, रमेश पाटील यांसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.प्रभाग सातमध्ये निवडून आल्यानंतर नगरसेवक महेंद्र दुसाने यांनी प्रभागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावा केला आहे. रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक सातमधील नवनीत लोहार यांच्या घरापासून ते प्रभाग क्रमांक सहामधील कुंभारवाड्यापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे दुसरे उद्घाटन गुज्जर गल्ली येथे नवनीत लोहार यांच्या घराजवळ नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, बांधकाम सभापती आरीफ बलेसरीया, स्थानिक शिवसेना नगरसेविका अरुणा पाटील, गटनेते आशिष मावची, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, बबिता वसावे, मीनल लोहार, खलील खाटीक, माजी नगरसेवक अजय पाटील, सुभाष कुंभार तसेच प्रभागातील स्थानिक नागरिक उपस्थित होते. या रस्त्यासाठी आमदार नाईक यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. तसेच ज्यांना श्रेय घ्यायचे असेल त्यांनी घ्यावे; मात्र लोकांना चांगले माहिती आहे, रस्त्यासाठी कोणी प्रयत्न केले, अशी टीका यावेळी करण्यात आली.
नगरपालिकाने बोगस ठेकेदारांचे लाड बंद करावेनवापूर शहरात अनेक भागांमध्ये डांबरीकरण रस्ते करण्यात आले; परंतु पहिल्याच पावसाळ्यात रस्ते उखडून गेल्याने नगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गुज्जर गल्लीतील रस्ता यापूर्वी दोन वेळा तयार करण्यात आला; परंतु काही दिवसांतच खराब झाल्याने तिसऱ्यांदा डांबरीकरण करण्यात येत आहे. बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांना बाजूला करत चांगल्या ठेकेदारांना काम देणे अपेक्षित आहे. नागरिकांनी नगरपालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील दर्जेदार काम करून पालिकेने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
भाजपच्या नगरसेवकांचा आंदोलनाचा इशाराभाजपने रस्त्याचे उद्घाटन केल्याने रस्त्याचे काम लगेच सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक सातमधील भाजपचे नगरसेवक महेंद्र दुसाणे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तहसीलदार व मुख्याधिकारी नवापूर यांना निवेदनाद्वारे २६ जानेवारी रोजी थाळीनाद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला असून, रस्ता डांबरीकरण कामाच्या प्रारंभ कार्यक्रमाला राजकीय रंग चढला आहे.दर्जेदार रस्ता तयार होणारनवापूर नगर परिषदेने एक वर्षापासून रस्ता मंजूर केला होता. कोरोनाकाळात रस्ता तयार करणे शक्य नसल्याने रविवारी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना दर्जेदार रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या नगरसेविका अरुणा पाटील यांनी दिले आहे.