नंदुरबार : देशात आणि राज्यात सध्या बर्ड फ्लूचा धोका वाढत असून, त्यामुळे आधीच कोरोनाने भयभीत झालेल्या जनमानसात अधिकच भीतीचे वातावरण दिसून येत आहे. या नव्या आजारावर उपायासाठी ‘नंदुरबार पॅटर्न’ उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात २००६ मध्ये काम करणाऱ्या यंत्रणेचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल.
देशात सर्वप्रथम २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूची लागण झाली होती. नवापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर तेव्हा पोल्ट्री व्यवसाय सुरू होता. ६० पेक्षाही अधिक पोल्ट्री व्यवसाय त्या वेळी सुरू होते. तेथूनच महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व विविध राज्यांत अंडी आणि कोंबड्यांचा पुरवठा होत होता. अतिशय भरभराटीला आलेल्या या व्यवसायावर त्या वेळी बर्ड फ्लूचे संकट कोसळले होते. त्यामुळे सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. बर्ड फ्लूचा एच-५ एन-१ हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हीएन इन्फ्लूएंझा हा विषाणू त्या वेळी नवापूरमध्ये आढळून आला होता. सुमारे २० हजारपेक्षा अधिक कोंबड्या त्यातून दगावल्या होत्या. देशात असा व्हायरस प्रथमच आल्याने त्या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन घेऊन या आजारावर तेव्हा प्रशासनाने मात केली होती. सायंटिफिक पद्धतीने पक्ष्यांची विष्ठा व पक्षी नष्ट करणे, त्यासाठी विशिष्ट आकाराचे खड्डे खोदणे, गावातील बस स्थानक गावाबाहेर तात्पुरत्या स्वरूपात सुरू करणे, रेल्वे थांबा बंद करणे, विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी विशिष्ट प्रकारची फवारणी करणे यासह अनेक उपाययोजना त्या वेळी करण्यात आल्या होत्या. त्यासाठी स्थानिक यंत्रणेला विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. नुकसानधारकांना तब्बल २० कोटींची मदत देण्यात आली होती. राज्य आणि केंद्र शासनाने संयुक्तपणे काम करून या संकटावर त्या वेळी मात केली होती.
सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आदी काही राज्यांत बर्ड फ्लूची लागण झाली आहे. नवापूरमध्ये जो विषाणू आढळला होता तोच विषाणू या भागातही दिसून येत आहे. ही लागण सध्या तरी प्राथमिक स्तरावर असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविता येऊ शकेल. त्यासाठी नवापूरमध्ये प्रशिक्षित करण्यात आलेल्या यंत्रणेचा वापर होणे आवश्यक आहे. या ठिकाणी काम करणारे त्या काळातील अधिकारी सध्या राज्यातील विविध भागांत कार्यरत आहेत. त्यांचाही शोध घेऊन बर्ड फ्लूवर नियंत्रणासाठी नियोजनाची गरज आहे.
- डाॅ. पी. अन्बलगण यांचा अनुभव मोलाचा ठरेल
नवापूरमध्ये बर्ड फ्लू आला त्या वेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगण होते. ते स्वत: व्हेटर्नरी डाॅक्टर होते. त्यामुळे त्यांनी स्वत: त्यावर लक्ष केंद्रित केले होते. विशेष म्हणजे राज्य शासनाने त्यांना बर्ड फ्लूच्या प्रशिक्षणासाठी बँकॉकला पाठविले होते. सध्या ते औद्याेगिक विकास महामंडळाचे राज्याचे संचालक आहेत. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जयंत गायकवाड यांचीही मोलाची भूमिका होती.