वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्हा परिषदेच्या पाच गट व पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी करण्यात आली. यात तीन गटात भाजप व दोन गटात काँग्रेस विजयी झाले. विजयी उमेदवारात माजीमंत्री यांची कन्या अॅड.सीमा वळवी व जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुहास नाईक यांचा समावेश आहे. मात्र निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींना पराभव चाखावा लागला. दरम्यान पंचायत समितीत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस, भाजपाचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आले आहेत.तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या १० गणासाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले होते. वामनराव बापूजी मंगल कार्यालयात सकाळी १० वाजेला घेण्यात आलेल्या मतमोजणीसाठी १० टेबल लावण्यात आले होते. अमोनी गटापासून मतमोजणीला सुरूवात करण्यात येवून अवघ्या अर्ध्यातासात निकाल जाहीर झाला. गटात काँग्रेसने खाते उघडल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. त्यानंतर प्रतापपूर, बोरद, आमलाड या तिन्ही गटामध्ये भाजपला विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. शेवटची मतमोजणी बुधावल गटाची घेण्यात आली. या गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सुरूवातीला सेनेचे आकाश वळवी यांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला होता. मात्र नर्मदानगर गणाकडील मतदानास सुरूवात झाल्यानंतर सुहास नाईक यांनी मोठी आघाडी घेत आकाश वळवींवर विजय प्राप्त केला़ बुधावल गटातील मतांची मोजणी सुरु असताना दोघा उमेदवारांसोबत त्यांच्या समर्थकांतही चलबिचल सुरु होती़ निकाल घोषित झाल्यानंतर उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. त्यावेळी विजयी उमेदवरांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला होता. दरम्यान, मतमोजणी स्थळी उमेदवाराच्या समर्थकांनी साडेआठ वाजेपासून उपस्थिती दिली होती़ प्रत्यक्षात मतमोजणी सकाळी दहा वाजेपासून सुरु झाली होती़शहरापासून मतमोजणी केंद्र फारच लांब होते. तरीही निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पाच गट व नऊ गणात उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. केवळ बुधावल वगळता एकाही ठिकाणी लक्षणीय मते उम्मेदवारांना मिळविता आले नाही.तालुक्यातील सर्वच गट-गणात शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या व चौथ्या स्थानावर राहिल्याचे प्रथमच अनुभवण्यास मिळाले़ तालुक्यातील बुधावलला दुसºया क्रमांकावर सेना होती. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार एस.पी. गवते, श्रीकांत लोमटे, रामजी राठोड यांनी परिश्रम घेतले. या वेळी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.१० सदस्यीय पंचायत समितीत काँग्रेस पाच व भाजप पाच असे सदस्य निवडून आल्याने तळोदा पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे. तथापि या निवडणुकीत अनेक विद्यमान सदस्यांना व त्यानच्या नातेवाईकांना मतदारांनी स्पष्ट नाकारले आहे तर काही विद्यमान सदस्यांच्या नातेवाईकांनी कौलदेखील दिला आहे. विद्यमान उपसभापती दीपक मोरे यांची पत्नी धनपूर गणातून पराभूत झाली. विद्यमान सभापती शांताबाई पवार यांचे चिरंजीव चंदनकुमार पवार मोड गणातून विजयी झाले आहेत. विद्यमान सदस्य विक्रम पाडवी व यशवंत ठाकरेहेदेखील पुन्हा विजयी झाले आहेत. मात्र माजी उपसभापती नंदूगीर गोसावी यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
तळोदा तालुक्यात भाजपाची मुसंडी; काँग्रेस बॅकफुटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:34 PM