काँग्रेसचा ‘गॅरंटी’ शब्द भाजपने चोरला : नाना पटोले यांचा आरोप
By मनोज शेलार | Published: March 6, 2024 05:20 PM2024-03-06T17:20:32+5:302024-03-06T17:20:47+5:30
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात येणार असून, जाहीर सभा देखील होणार आहे.
नंदुरबार :काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत वापरलेला व लोकप्रिय केलेला ‘गॅरंटी’ हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. किती वर्षे गांधी परिवाराच्या नावाने खडे फोडणार, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून नंदुरबारात पत्रकारांशी बोलताना केला.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात येणार असून, जाहीर सभा देखील होणार आहे. यानिमित्त आढावा घेण्यासाठी बुधवारी नाना पटोले नंदुरबारात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विकास न करता भाजप १० वर्षांपासून फक्त काँग्रेसवर टीका करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर टीका करतात. मग त्यांच्याच पक्षातील घराणेशाही त्यांना दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित करून अमित शहा यांचा मुलगा जय शहा कधी क्रिकेट खेळल्याचे ऐकिवात नाही, असे असताना देशाच्या क्रिकेट संघटनेचा तो प्रमुख बनतो, याला काय म्हणावे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये दम होता तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत.
लोकसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. उलट महायुतीमधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपने काय हालत केली आहे, ते जनता पाहत आहे. भ्रष्ट व्यवस्थेला ताकद देण्याचे काम भाजप करीत आहे. काँग्रेसचा कर्नाटकमधील ‘गॅरंटी’ हा शब्द भाजपने चोरला आहे. मणीपूर ते मुंबई ही राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असून, यात्रेचे भव्य स्वागत व्हावे, ही भूमिका जनतेची असल्याने तयारीचा आढावा घेत असल्याचे पटोले यांनी सांगितले.