लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्ष आदेश प्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका लढविल्या जातील. भाजप हा प्रमुख विरोधीपक्ष आपला राहणार आहे. जास्तीत जास्त जागा शिवसेनेच्या निवडून येतील या दृष्टीने सर्वांनी कामाला लागावे असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारात झालेल्या मेळाव्यात बोलतांना केले.तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक येथील संजय टाऊन हॉल मध्ये सोमवारी दुपारी झाली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिपक गवते, अॅड.राम रघुवंशी, माजी जि.प.सभापती विक्रमसिंग वळवी, माजी पं.स.सभापती रंजना नाईक, बाजार समिती सभापती किशोर पाटील, माजी जि.प.सदस्य भरत पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, गजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.यावेळी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, पक्ष आदेश प्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जायाचे आहे. आपला प्रमुख विरोधी पक्ष हा भाजप राहणार आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी. महाविकास आघाडी एकत्रीतपणे निवडणूक लढविण्याचे सुतोवाच त्यांनी केले. जे इच्छूक असतील त्यांच्या मुलाखती घेवून ती नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविले जातील. एका जागेवर एकापेक्षा अधीकजण इच्छूक असेल तर चर्चेने तो तिढा सोडविला जाणार आहे. परंतु उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करून निवडणूक लढविणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. जास्तीत जास्त जागांवर उमेदवार दिले जाणार असून लवकरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.दिपक गवते यांनीही मनोगत व्यक्त करून पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
भाजप हाच आपला प्रमुख विरोधक राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:59 AM