नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षातील उमेदवार जाहीर झाल्याने दोघांनी आपापल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. विशेषत: मित्र पक्ष व प्रमुख कार्यकर्ते यांच्यातील रूसवे फुगवे काढण्यास भाजपाने आघाडी घेतली आहे.उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत व काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी यांनी वैयक्तिक प्रचाराला सुरूवात केली होती. तथापि मध्यंतरीच्या काळात उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने दोन्ही उमेदवारांचा प्रचार थंडावला होता. आता अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोघांनीही प्रचाराला सुरूवात केली आहे. विशेषत: लग्न समारंभ व होळी उत्सवात प्रचारासाठी दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. सध्या सातपुड्यातील होळी उत्सव सुरू आहे. सलग पाच दिवस हा उत्सव सुरू असतो. यासाठी हजारो लोक एकत्र येतात. या शिवाय दुसऱ्या दिवशी मेलादाचा कार्यक्रम होतो. त्या वेळीही लोकांची उपस्थिती असते. त्याचा लाभ घेण्याची संधी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांनी साधली आहे. तसेच लग्नसराई असल्याने रोज हे उमेदवार लग्नांना हजेरी लावतांना दिसतात.वैयक्तिक प्रचाराबरोबरच रूसवे फुगवे काढण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहे. भाजपाची स्थिती पाहता मतदार संघातील आमदार उदेसिंग पाडवी व उमेदवार डॉ.हिना गावीत यांच्यातील मतभेद उघड आहे. परंतु निवडणूक काळात डॉ.हिना गावीत यांनी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या निवासस्थानी जावून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच मित्र पक्ष असलेल्या युतीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही संयुक्त पत्रकार परिषद घेवून यापूर्वीच निवडणूक काळात एकत्रपणे काम करण्याचे त्यांनी जाहीर केले.काँग्रेसतर्फे मात्र अद्याप आघाडीतील राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संयुक्त चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे उमेदवारी न मिळालेल्या इच्छूक उमेदवारांच्या नाराजी बाबत संभ्रम दूर झालेला नाही. उमेदवार अॅड.के.सी. पाडवी हे वैयक्तिक भेटी गाठी घेत काही नाराज कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
रूसवे फुगवे काढण्यात भाजपाची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 9:35 PM