नंदुरबार : नागरिकत्व दुरूस्ती कायदा अर्थात सीएए आताच लागू करण्याचे कारण काय? नऊ वेळा सर्वोच्च न्यायालयाकडून मुदत मागण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करीत साडेचार वर्ष या कायद्याच्या नियमावली तयार करण्यात लागू शकत असतील तर भाजप सरकारचा उद्देश साफ नाही हे स्पष्ट होते असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नंदुरबारातील पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, रामाच्या नावावर भाजप राजकारण करीत असून कॉंग्रेस श्रीरामाचे पुजारी तर भाजप व्यापारी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त जयराम रमेश हे नंदुरबारात आले आहेत. दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते. जयराम रमेश यांनी सांगितले, खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा ही पाच स्तंभांवर काढण्यात आली आहे. त्या स्तंभाची गॅरंटी देशाला दिली जात आहे. त्यातील दोन गॅरंटी या महाराष्ट्रातून दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत तीन न्यायांवर गॅरंटी दिली असून त्यात शेतकऱ्यांना सन्माने उभे करण्यासाठी एमएसपीला कायद्याचा दर्जा देणार. शेतकऱ्यांची कर्ज माफी करणे. सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय गणना करण्यावर भर देणे. त्यामुळे कुठल्या जातीचा देशाच्या विकासात किती टक्का हिस्सा आहे हे कळेल. शिवाय ५० टक्के आरक्षण मर्यादेवर संशोधन करून मर्यादा हटविण्यासाठी प्रयत्न करणार. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी त्यांना सन्मानाने उभे करणार. चौथी गॅरंटी ही धुळ्यातील महिला मेळाव्यात दिली जाणार आहे. नारीशक्ती न्याय गॅरंटी म्हणून ती राहील तर पाचवी गॅरंटी ही मुंबई येथील सभेत दिली जाणार असून श्रमीक न्याय गॅरंटी राहणार आहे.
पाच दिवस यात्रा महाराष्ट्रात राहणार असून या दरम्यान खासदार राहुल गांधी हे त्र्यंबकेश्वर येथे ज्योर्तीलिंगाचे दर्शन घेणार आहेत. १६ रोजी चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप होऊन १७ रोजी दुपारी कॉंग्रेसच्या घटक पक्षांची व्यापक रॅली होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय १७ तारखेनंतर होणार असून घटक पक्ष आतापर्यंतच्या चर्चेवर समाधानी असल्याचे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
दरम्यान, रामाच्या नावावर देशात राजकारण केले जात आहे. परंतु आमच्या हृदयात राम आहे. आम्ही रामाचे पुजारी आहे तर जे राजकारण करीत आहेत ते रामाचे व्यापारी असल्याचेही त्यांनी सांगितले.