हिरालाल रोकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिल्हा परिषदेच्या १४ गटांपैकी सर्वाधिक नऊ जागांवर भाजपाने तर पाच जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केला़ पंचायत समितीच्या २८ पैकी सर्वाधिक १४ जागा भाजपाने जिंकल्या असून १२ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला़ गट आणि गणात सर्वाधिक जागा जिंकत तालुक्यात भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे़ काँग्रेसचे अभिजीत पाटील म्हसावद गटातून विजयी तर पाडळदा गटात पराभूत झाले आहेत़पाडळदा गटातून भाजपचे धनराज पाटील, म्हसावद गटातून काँग्रेसचे अभिजीत पाटील, लोणखेडा गटातून भाजपाच्या उमेदवार तथा सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील तर कहाटूळ गटातून काँग्रेसच्या शालिनी सनेर यांनी विजय मिळविला़ भाकपाचा बालेकिल्ला असलेल्या पाडळदा गटात पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे़ या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रत्येकी नऊ गटात उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही़पंचायत समितीच्या २८ जागांपैकी लोणखेडा गणातील जागेवर भाजपच्या बायजाबाई भिल बिनविरोध निवडून आल्या़ त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या २७ पैकी सर्वाधिक १४ जागा भाजपाने ताब्यात घेतल्या़ भाकपा आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे़ तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या लोणखेडा गटात जयश्री पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर बाजार समितीच्या आवारात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला़ यात दिपक पाटीलही सहभागी झाले होते़म्हसावद गटातून विजयी झालेले अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी त्यांच्या मोहिदा रोड परिसरातील घरासमोर एकच जल्लोष केला़ अभिजित पाटील यांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला़
शहाद्यावर भाजपाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:33 PM